22 January 2021

News Flash

ग्रॅँडमास्टर अरोनियनच्या पत्नीचे अपघाती निधन

अर्मेनियाच्या सरकारमध्ये सल्लागारांमध्येही तिचा समावेश होता.

संग्रहित छायाचित्र

 

सध्या करोनामुळे जग हादरलेले असताना मंगळवारी बुद्धिबळ जगताला आणखी एक धक्का बसला आहे. अर्मेनियाचा अव्वल ग्रॅँडमास्टर बुद्धिबळपटू लेव्हॉन अरोनियनची पत्नी महिला आंतरराष्ट्रीय मास्टर अरियानी कॅओईलीचे मंगळवारी अपघाती निधन झाले. ती अवघ्या ३३ वर्षांची होती.

अर्मेनियातील येरेवान येथे १५ मार्चला प्रवास करताना तिची गाडी पूलाखालील खांबावर आदळली. गेले १५ दिवस ती येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. मात्र अखेर तिच्या निधनाची बातमी तिचा पती लेव्हॉन अरोनियानने समाजमाध्यमांवरून दिली. २०१७मध्ये या दोघांचा विवाह झाला होता. बुद्धिबळासोबतच सामाजिक कार्यकर्ती, राजकीय सल्लागार, नृत्यांगना, बॉक्सिंगपटू, बाईकर अशा विविध क्षेत्रांमध्येही अरियानी पारंगत होती. अर्मेनियाच्या सरकारमध्ये सल्लागारांमध्येही तिचा समावेश होता.

मनिला (फिलिपाइन्स) येथे जन्मलेल्या अरियानीने वयाच्या सहाव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. १६ वर्षांखालील मुलींची आशियाई स्पर्धादेखील तिने २०००मध्ये जिंकली होती. २००२च्या ‘फिडे’ बुद्धिबळ क्रमवारीत तिचे २३०९ एलो गुण झाले. २३००च्या वर एलो गुण मिळाल्याने महिलांचा आंतरराष्ट्रीय मास्टर हा मानाचा किताब अरियानीला मिळवता आला.

अरियानीचा विविध भाषादेखील बोलण्यात हातखंडा होता. जर्मन विद्यापीठातून तिने पीएचडीदेखील केले आहे. खडतर आव्हान स्वीकारायला तिला नेहमीच आवडत असे. मुलींची बुद्धिबळ खेळातील संख्या वाढण्यासाठी ती भरपूर मेहनत घेत होती. बुद्धिबळामुळे मनसामर्थ्य वाढण्यास मदत होते, असे ती नेहमी मानायची.

बुद्धिबळामुळेच प्रेमविवाह!

अरियानी आणि लेव्हॉन यांची पहिली भेट १९९६मध्ये जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत झाली होती. २००६मध्ये त्यांच्यात मैत्री झाली. अखेर २०१५मध्ये दोघांनी त्यांच्या लग्नाची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०१७मध्ये दोघे विवाहबद्ध झाले. त्या लग्नाला अर्मेनियाचे राष्ट्राध्यक्ष सर्झ सर्गस्यानदेखील उपस्थित होते. २०१८मध्ये भारतात झालेल्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत अरोनियन सहभागी झाला होता. त्यावेळेस त्याच्यासोबत अरियानीही भारत दौऱ्यावर आली होती. ‘‘तुझ्यासोबत आयुष्य घालवणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी यशस्वी चाल आहे,’’ असे अरोनियानने त्याच्या पत्नीविषयी लिहिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 12:21 am

Web Title: accidental death of grandmaster aronians wife abn 97
Next Stories
1 ‘आयपीएल’ न झाल्यास स्थानिक क्रिकेटपटूंना फटका
2 जागतिक बॅडमिंटन स्पर्धा लांबणीवर?
3 ‘आयओसी’च्या खेळाडूंच्या आयोगाकडून स्वागत
Just Now!
X