ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महत्त्वपूर्ण लढत धरमशालाऐवजी कोलकाता येथे घेण्याचा निर्णय हिमाचल क्रिकेट असोसिएशनसाठी अपघातासारखाच आहे, असे मत भारताचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केले.

‘‘काहीही चूक नसताना धरमशालाने बहुचर्चित सामना गमावला आहे. हिमाचल प्रदेश असोसिएशन आणि धरमशाला यांच्याप्रति मला वाईट वाटते आहे. धरमशालाचे मैदान भारतातील सवरेत्कृष्ट स्टेडियम्सपैकी एक आहे आणि तिथे भारत-पाकिस्तान लढत सुयोग्य पद्धतीने आयोजित होऊ शकली असती,’’ असे गांगुलीने सांगितले.

कोलकाताचे इडन गार्डन्स भारत-पाकिस्तान लढतीच्या आयोजनासाठी तयार आहे, या प्रश्नावर गांगुली म्हणाला, ‘‘या लढतीसाठी आम्ही सज्ज आहोत. २०११ मध्ये इडन गार्डन्सवर आयोजित भारत आणि इंग्लंड यांच्यातील विश्वचषकाची लढत दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आली होती. अपघात झाला आहे. यामुळे धरमशालाच्या लोकांना त्रास आणि नुकसान होणार आहे. मात्र हे आमच्याही बाबतीत घडले आहे. आम्ही या सामन्यासाठी तयार आहोत. अन्य लढतींप्रमाणेच या सामन्याचे आयोजन होईल. सुरक्षा व्यवस्था कडेकोट असेल, परंतु खेळाला कोणतीही बाधा पोहोचणार नाही.’’

तो पुढे म्हणाला, ‘ हा सामना आम्हाला मिळाला याचा आनंद आहे. भारतीय संघाच्या सामन्याचे आयोजन मिळावे अशी आम्ही विनंती केली होती. अन्य सात मैदानांवर भारतीय संघाचे सामने होणार आहेत. परंतु अंतिम लढतीचे आयोजन मिळालेले असल्याने आमची मागणी पूर्ण होत नव्हती. पण आता ती संधी मिळणार आहे’.