यंदा भारतात होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत अनेक संघ इंग्लंडला घाबरतील, असा विश्वास इंग्लंड संघाचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूडने व्यक्त केला आहे. कॉलिंगवूडच्या नेतृत्वात इंग्लंडने 2010 मध्ये टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. मात्र, त्या इंग्लंडच्या संघापेक्षा सध्याचा संघ अधिक बळकट असल्याचे कॉलिंगवूडने सांगितले.

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरू आहे. उभय संघ या मालिकेत 2-2 अशा बरोबरीत आहेत. आज (20 मार्च) ला मालिकेचा निर्णायक सामना खेळला जाईल. या मालिकेनंतर दोन्ही संघात तीन सामन्यांची एदविसीय मालिका खेळवली जाईल. कसोटी मालिका गमावल्यानंतर ईयॉन मॉर्गनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंडने टी-20 मालिकेत जबरदस्त प्रदर्शन केले. इंग्लंडचा एकंदरीत फॉर्म पाहता कॉलिंगवूडने आपले मत दिले.

काय म्हणाला कॉलिंगवूड?

इंग्लंड संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळणारा कॉलिंगवूड म्हणाला, “या वर्ल्डकपमध्ये अनेक संघ इंग्लंडला घाबरतील. कारण, गेल्या काही वर्षांपासून आपला फॉर्म जबरदस्त राहिला आहे. प्रथम क्रमांकापासून ते अकराव्या खेळाडूपर्यंत आपल्याकडे चांगले फलंदाज आहेत, जे सामना जिंकून देऊ शकतात. ही टीम 2010च्या तुलनेत खूप वेगळी आहे.”

“2010च्या संघाने शेवटी लय पकडली होती. आम्ही संघ निवडीत काही जोखीमही घेतली. कोणत्या प्रकारचे क्रिकेट खेळायचे हे आम्हाला माहीत होते. माझ्या म्हणण्यानुसार हा संघ खूप चांगला आहे”, असेही कॉलिंगवूड म्हणाला.

2015च्या वर्ल्डकपमधून इंग्लंडने लवकर एक्झिट घेतली. परंतु त्यानंतर इंग्लंडने आपल्या संघात सुधारणा केली आणि विश्वस्तरावर एक बलाढ्य संघ म्हणून चर्चा करण्यास भाग पाडले. इंग्लंडने 2019 मध्ये प्रथमच एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला.

यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंड ‘फेव्हरिट’

यंदा टी-२० विश्वचषक भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी इंग्लंडचा संघ फेव्हरिट मानला जात आहे. भारतीय संघाविरूद्धच्या सध्याच्या मालिकेत इंग्लंडने दमदार कामगिरी केली आहे. सध्याच्या संघात अनेक जबरदस्त खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे एकहाती सामने जिंकून देण्याची क्षमता आहे.