रोहन गुजर

भारत आणि अफगाणिस्तानचा सामना पाहिला, तेव्हापासून आपला संघ कुठे तरी कमी पडतोय, असे वाटत होते. संघनिवडीच्या बाबतीत आपल्याकडून चुका झाल्या, असे मला वाटते. इंग्लंडविरुद्ध खेळतानाही ते जाणवत होते. महेंद्रसिंह धोनीला विश्वचषक विजयाची भेट द्यायला हवी होती. धोनी कर्णधार झाला, तेव्हापासून एक शक्तिशाली संघ म्हणून आपण पुढे आलो. धावांचा पाठलाग करताना खेळाडू नेमके कोणत्या दबावाखाली होते, हेच मला कळत नाही. माझे मित्र सांगत होते की, भारत आणि इंग्लंड अंतिम सामन्यात असतील, पण मी त्यांना सांगायचो की, तुम्ही न्यूझीलंडला कमी समजू नका. कारण न्यूझीलंड छान धोरण आखून खेळत आहे. त्यांचे गोलंदाज कमाल आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन दबावाखाली चांगला खेळतो. तसेच किवींच्या ट्रेंट बोल्टची गोलंदाजी मला खूप आवडते. हे दोघेही उत्तम खेळाडू असल्यामुळे माझा पाठिंबा न्यूझीलंडला असेल. पण सर्व जागतिक संघांनी एकदा तरी विश्वचषक जिंकायला हवा. इंग्लंड आणि न्यूझीलंड दोन्ही उत्तम संघ आहेत. दोघांमध्ये कोण जिंकणार, ही उत्सुकता आहे.

(शब्दांकन : भक्ती परब)