24 April 2019

News Flash

“भविष्यातही ‘किंग कोहली’च राहायचं असेल तर तू द्रविडचा आदर्श घे”

'कर्णधार या नात्याने विराटने केलेले वक्तव्य हे मूर्खपणाचे दर्शन घडवणारेच'

विराट तू द्रविडाचा आदर्श घे

भारतीय क्रिकेटपटू आवडत नसतील तर हा देश सोड आणि दुसऱ्या देशात जाऊन राहा, असा टोला चाहत्यांना लगावणाऱ्या विराट कोहलीवर सर्वच स्तरामधून टिका होताना दिसत आहे. आता या वादामध्ये रंग दे बसंती फेम अभिनेता सिद्धार्थनेही उडी घेतली आहे. सिद्धार्थने विराटला त्याच्या व्यक्तव्यावरून सुनावताना द्रविडाचा आदर्श घे असा सल्ला दिला आहे.

भारतीय खेळाडूंपेक्षा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे फलंदाज अधिक आवडतात असं मत व्यक्त करणाऱ्या चाहत्याला थेट देश सोडून जाण्याचा सल्ला विराटने दिला. काही दिवसांपासून हा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांना विराटचे हे उत्तर पटले नसून त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. तर प्रसारमाध्यमांबरोबर बीसीसीआयनेही विराटला या उत्तरावरून चांगलेच फैलावर घेतले आहे. आता या यादीमध्ये अभिनेता सिद्धार्थचाही समावेश झाला आहे. सिद्धार्थने यासंदर्भात ट्विट करुन आपले मत व्यक्त केले आहे.

किंग कोहली म्हणून लोकांनी आपल्याला ओळखावे असं विराटला वाटतं असेल तर भविष्यामध्ये त्याने अशा प्रश्नावर ‘द्रविड काय म्हणाला असता?’ हा विचार करायला हवा. भारतीय संघाचा संघाचा कर्णधार या नात्याने विराटने केलेले वक्तव्य हे मूर्खपणाचे दर्शन घडवणारेच आहे, अशा शब्दात सिद्धार्थने विराटच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी विराटला चांगलेच फैलावर घेतले. विराटला हे लक्षात घ्यायला हवे की तो म्हणतो त्याप्रमाणे चाहते दुसऱ्या देशात गेले तर प्युमा वगैरेसारख्या कंपन्या त्याच्याबरोबर १०० कोटींचे करार करणार नाहीत. बीसीसीआयच्या कमाईवरही त्याचा परिणाम होईल आणि अर्थात असे झाले तर खेळाडूंच्या मानधानाला कात्री लागेल. जर त्याने बीसीसीआयबरोबर केलेला करार पाहिला तर त्याच्या लक्षात येईल या ‘देश सोडून जा’ वक्तव्यामुळे त्याने करारातील काही नियमांचा भंग केला आहे. त्याने याआधी बीसीसीआयने नाइके कंपनीबरोबर केलेला करार मोडून प्युमाच्या कार्यक्रमासाठी इंग्लंडला जात करार मोडला होता त्याचप्रमाणे त्याने आत्ताही करारातील नियमांचे उल्लंघन केल्याचे चौधरी यांनी निदर्शनास आणून दिले.

First Published on November 9, 2018 12:13 pm

Web Title: actor siddharth lashes out at virat kohli for his leave india comment