*   हवाला प्रकरणातील दीड कोटी रुपये जप्त
*   अल्पेशकुमार पटेल आणि प्रेम तनेजा यांना अटक
क्रिकेट सट्टेबाजी प्रकरणात मुंबई पोलिसांनी मंगळवारी बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंग याच्यासह तिघांना अटक केली. सट्टेबाजीसाठी हवालामार्फत पैशांचे व्यवहार करणाऱ्या एका आरोपीकडून दीड कोटी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे.
आयपीएल ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेता वीरेंद्र दारा सिंग रंधवा ऊर्फ विंदू, सट्टेबाजांच्या पैशांचे व्यवहार करणारा अल्पेशकुमार पटेल (३९) आणि प्रेम तनेजा (४५) या तिघांना अटक केली. विंदू याला मंगळवारी सकाळी त्याच्या जुहू येथील निवासस्थानातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन मोबाइल, लॅपटॉप आणि डायऱ्या जप्त करण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांनी दिली. अल्पेश सट्टेबाजांच्या पैशांचे व्यवहार हवालामार्फत करायचा. त्याचे मुंबईत दोन ठिकाणी कार्यालये असून त्याच्याकडून एक कोटी २८ लाख ७४ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत, तर प्रेम तनेजाला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. तो दुबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. अल्पेश पटेल दुबई, मुंबई, दिल्ली येथील सट्टेबाजांचे पैशांचे व्यवहार सांभाळायचा. हवालामार्फत तो पैसे पोहोचवायचा आणि आणायचा. त्याला पाव टक्क्याने दलाली मिळायची.  
विंदूवर मुंबई पोलिसांची नजर होतीच. तीन वर्षांपासून तो आयपीएलच्या सामन्यात सट्टेबाजी करायचा, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्याने या सट्टेबाजीत कोटय़वधी रुपये कमावल्याची माहितीही समोर आली आहे. तो सट्टेबाजांच्या संपर्कात असल्याचे हिमांशू रॉय यांनी सांगितले. त्याच्या नेमक्या सहभागाबाबत सध्यातरी पोलिसांनी मौन बाळगले असले तरी अनेक खेळाडूंशीसुद्धा त्याचे संबंध असून ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणात त्याचा संबंध असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. या तिन्ही आरोपींना किल्ला न्यायालयात हजर केले असता त्यांना २४ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी बॉलिवूडच्या काही बडय़ा हस्तींना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.