बॉल टेम्परिंग प्रकरणाबाबत ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू कॅमेरून बॅनक्रॉफ्टने नवीन खुलासा केल्यानंतर याविषयी अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आता याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज आणि माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाला सुनावले आहे. बॉल टेम्परिंगचा वाद आगामी येणाऱ्या काळात ऑस्ट्रेलियन क्रिकेटला टोचत राहिल. बॅनक्रॉफ्टसारख्या बर्‍याच खेळाडूंकडे बरीच माहिती आहे आणि ते उघड करण्यासाठी ते योग्य वेळाची वाट पाहत आहेत, असे गिलख्रिस्टने सांगितले.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याप्रकरणी योग्यप्रकारे चौकशी केली नव्हती असे गिलख्रिस्टने म्हटले. तो म्हणाला, ”या प्रकरणात नेहमीच चर्चा केली जाईल. कोणी आपल्या पुस्तकात याचा उल्लेख केला असेल किंवा मुलाखतीत त्याबद्दल चर्चा केली असेल. मला वाटते, की काही लोक जे यापासून दूर राहिले, ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत, जेणेकरुन मोठा खुलासा होऊ शकेल. जर अजूनही हे प्रकरण बाहेर काढले जात असेल, तर क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यासाठी जबाबदार आहे. त्यांनी घाईत चौकशी करून हे प्रकरण मिटवले. त्यांनी या प्रकरणाची काळजीपूर्वक चौकशी केली नाही.”

२०१८मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान बॉल टेम्परिंगच्या घटनेबाबत ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू कॅमेरून बॅनक्रॉफ्टने धक्कादायक खुलासा केला. बॉल टेम्परिंगची माहिती ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना आधीच होती, असे बॅनक्रॉफ्टने सांगितले. या घटनेनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांसाठी बंदी घातली होती, तर तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर १२ महिन्यांसाठी बंदी घातली होती.

बॉल टेम्परिंगची घटना

२०१८च्या मार्चमध्ये केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात आली होती. या मलिकेच्या तिसऱ्या सामन्यादरम्यान टीव्हीवर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टला सँडपेपरचा पिवळा तुकडा लपवताना पाहण्यात आले होते. याच दिवशी संध्याकाळी स्मिथ आणि बॅनक्रॉफ्टने यासंबंधी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मुद्दाम चेंडूंशी छेडछाड केल्याचे कबूल केले होते. मात्र, नंतर या प्रकरणात वॉर्नरही दोषी असल्याचे समजले होते.