ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू अ‍ॅडम गिलख्रिस्टचे मत
भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याच्या चाहत्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू अ‍ॅडम गिलख्रिस्ट याचेही नाव येते. मात्र, विराटच्या फलंदाजीबरोबर त्याच्या नेतृत्व कौशल्याने गिलख्रिस्टचे मन जिंकले आहे. कोहली भारतीय संघाला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात पुढे घेऊन जाईल, असा विश्वास गिलख्रिस्टने व्यक्त केला आहे.
‘‘विराटने मला प्रभावित केले आहे. आमच्या डोळ्यादेखत त्याने नेतृत्वाचे कौशल्य शिकले आहे. कसोटी संघाचे नेतृत्व करताना त्याने तडफतेने खेळ केला. त्याची हीच वृत्ती संघाला प्रेरणादायी ठरेल, असे मला वाटते,’’ असे मत गिलख्रिस्टने व्यक्त केले. ऑस्ट्रेलियाचा भारतातील शैक्षणित सदिच्छादूत म्हणून गिलख्रिस्टची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोहलीने तिन्ही प्रकारात भारतीय संघाचे नेतृत्व करावे अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या गिलख्रिस्टने मात्र महेंद्रसिंग धोनीच्या योगदानाला विसरून चालणार नसल्याचे सांगितले. तिन्ही प्रकाराचे कर्णधारपद स्वीकारण्यासाठी कोहली सक्षम आहे का, यावर गिलख्रिस्ट म्हणाला,‘‘याबाबतचा तर्क मी मांडू शकत नाही. ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर धोनीने अजून काही काळ खेळत राहण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. तो एक उत्तम कर्णधार आहे आणि त्याचे भारतीय क्रिकेटमधील योगदान अमूल्य आहे. त्यामुळे अजून प्रदीर्घ काळ तो ही जबाबदारी पेलू शकतो आणि कोहलीकडे अजून दहा वर्ष क्रिकेट शिल्लक आहेत. त्यामुळे कर्णधारपद स्वीकारण्यासाठी त्याच्याकडे बराच काळ आहे.’’