04 March 2021

News Flash

विराटला साथ द्या!

माजी क्रिकेटपटू अ‍ॅडम गिलख्रिस्टचा भारतीय फलंदाजांना सल्ला

माजी क्रिकेटपटू अ‍ॅडम गिलख्रिस्टचा भारतीय फलंदाजांना सल्ला

ऑस्ट्रेलियन खेळपट्टय़ांवर भारताला कसोटी मालिका जिंकायची असल्यास संघातील इतर फलंदाजांनी कर्णधार विराट कोहलीला साथ देणे अत्यंत आवश्यक आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टने सोमवारी व्यक्त केली. २०१४-१५च्या कसोटी मालिकेत कोहलीने चार शतके झळकावली होती, मात्र इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने भारताला मालिका २-० अशी गमवावी लागली होती.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला ६ डिसेंबरपासून अ‍ॅडलेड येथे सुरुवात होत असून कोहलीसाठी हे मैदान फारच लाभदायक ठरले आहे. २०१४ मध्ये येथे झालेल्या कसोटी सामन्यात कोहलीने दोन्ही डावांत शतक झळकावले होते.

‘‘ट्वेन्टी-२० मालिका आता संपली असून सर्वाचे लक्ष आता कसोटी मालिकेकडे लागले आहे. माझ्या मते कोहली २०१४ प्रमाणेच या मालिकेतसुद्धा त्याची छाप पाडण्यात यशस्वी होईल. काही दिवसांपूर्वीच त्याच्याशी माझा संवाद झाला. त्या वेळी त्याचा उंचावलेला आत्मविश्वास व सिडनीतील तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात त्याने साकारलेली खेळी पाहता त्याला रोखणे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसाठी कठीणच जाईल,’’ अशा शब्दांत गिलख्रिस्टने कोहलीवर स्तुतीसुमने उधळली.

गिलख्रिस्टच्या मते, भारताला मालिकेत वर्चस्व गाजवण्यासाठी इतर फलंदाजांनी कोहलीसह खेळपट्टीवर ठाण मांडणे गरजेचे आहे. यावरच भारताचे मालिकेतील यश अवलंबून आहे. कोहलीला बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ वेगळी रणनीती आखत आहे का, याविषयी विचारल्यावर गिलख्रिस्ट म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियन गोलंदाज कोहलीसाठी काय व्यूहरचना आखत असतील, याविषयी मी काहीही सांगू शकत नाही. पण नव्या चेंडूवर भारताच्या सलामीवीरांना लवकरात लवकर बाद केल्यास कोहलीची चाचपणी होऊ शकते. त्यामुळे कोहलीला नव्या चेंडूसमोर खेळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाने मेहनत घेतली पाहिजे.’’

त्याशिवाय कसोटी मालिका जिंकण्याची भारतालाच सर्वाधिक संधी असून भारतीय गोलंदाजांकडे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना दोनदा बाद करण्याची क्षमता आहे, असेही गिलख्रिस्टने सांगितले. ‘‘भारतीय संघात जसप्रीत बुमरा व भुवनेश्वर कुमार सारखे प्रतिभावान गोलंदाज आहेत. त्याशिवाय भारताची फिरकीची बाजूही ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनपेक्षा तुलनेने नक्कीच वरचढ आहे. मात्र मिचेल स्टार्क, जोश हॅझलवूड यांच्यापुढे भारतीय फलंदाजांची कसोटी लागेल,’’ असे गिलख्रिस्टने नमूद केले. चार कसोटींनंतर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकादेखील खेळणार आहे.

स्मिथ-कोहलीची झुंज अवर्णनीय!

चेंडू फेरफारप्रकरणी दोषी आढळलेल्या ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला मालिकेत संघर्ष करावा लागेल, हे पक्के असून स्मिथ विरुद्ध कोहली यांच्यातील द्वंद्व पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांचादेखील यामुळे हिरमोड झाला आहे, असे गिलख्रिस्ट म्हणाला. ‘‘विश्वातील कोणत्याही खेळपट्टय़ांवर धावा करण्याची या दोघांमध्ये क्षमता असून त्यांच्यातील झुंजीचे वर्णन करणे अशक्य आहे,’’ असे गिलख्रिस्टने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 1:36 am

Web Title: adam gilchrist virat kohli
Next Stories
1 बॉक्सिंगमधील यश सुखावह!
2 आशियाई चषकापूर्वी भारताचा ओमानशी सामना
3 राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : मुलींमध्ये ठाणे अजिंक्य
Just Now!
X