बर्डसह तिघे जण तिसऱ्या कसोटीत पदार्पण करणार; दक्षिण आफ्रिका निभ्रेळ यशासाठी उत्सुक

मायभूमीवर सलग दोन कसोटी सामन्यांसह मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमध्ये धक्कादायकरीत्या बदल झाले आहेत. त्यामुळे गुरुवारपासून सुरू होणारी तिसरी आणि अखेरची कसोटी जिंकून तरी ऑस्ट्रेलियाचे गुलाबी दिवस परतणार का, याची सर्वानाच उत्सुकता आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच गुलाबी चेंडूसह कसोटी सामना खेळणार आहे. हे पथ्यावर पडल्यास ३-० अशा पद्धतीने निभ्रेळ यश ते मिळवू शकतील. मात्र ऑस्ट्रेलियाचा संघ सलग दुसऱ्यांदा ‘पाटी कोरी’ न ठेवण्याचा प्रयत्न करील.

ऑस्ट्रेलियाकडे गुलाबी चेंडूने खेळण्याचा पुरेसा अनुभव गाठीशी आहे. त्यामुळे या कसोटीत त्यांचे पारडे जड मानले जात आहे. दुसऱ्या कसोटीनंतर अनेक घटना घडल्यामुळे त्याचे पडसादसुद्धा या सामन्यात उमटू शकतील. ऑस्ट्रेलियाच्या निवड समिती प्रमुखांची आणि सहा खेळाडूंची त्यानंतर हकालपट्टी झाली होती. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या फॅफ डय़ू प्लेसिसला चेंडू कुरतडल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला असला तरी सुदैवाने एका सामन्याच्या बंदीच्या शिक्षेतून सुटका मिळाली आहे.

या सामन्यात जॅक्सन बर्ड हा ऑस्ट्रेलियाचा तिसरा वेगवान गोलंदाज असेल, असे कर्णधार स्टीव्हन स्मिथने स्पष्ट केले आहे. अखेरच्या स्थानासाठी टास्मानियाच्या बर्डने अ‍ॅडलेडचा वेगवान गोलंदाज चॅड सायर्सला मागे टाकले. टीकेच्या लक्ष्यस्थानी असलेल्या फिरकीपटू नॅथन लिऑनला संघात स्थान देण्यात आले आहे.

‘‘शेफर्ड ढाल क्रिकेट स्पध्रेत गुलाबी चेंडूनिशी खेळण्याचा बर्डकडे अनुभव आहे. याचप्रमाणे नेटमध्ये त्याने फलंदाजीसुद्धा उत्तम केली,’’ असे स्मिथने सांगितले. त्यामुळे इंग्लंडमध्ये जन्मलेला सलामीवीर मॅट रेनशॉ, मधल्या फळीतील फलंदाज पीटर हँड्सकोंब आणि निक मॅडिन्सन असे तिघे जण अ‍ॅडलेड कसोटीत पदार्पण करणार आहेत.

संघ

  • ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, मॅट रेनशॉ, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकोंब, निक मॅडिन्सन, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), मिचेल स्टार्क, जोश हॅझलवूड, नॅथन लिऑन, जॅक्सन बर्ड.
  • दक्षिण आफ्रिका : स्टीफन कुक, डीन एल्गर, हशिम अमला, जे. पी. डय़ुमिनी, फॅफ डय़ू प्लेसिस, तेंबा बव्हुमा, क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), व्हर्नन फिलँडर, कायले एबॉट, कॅगिसो रबाडा, केशव महाराज, ताबारेझ शामसी.

 

ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात कार्टराइटचा समावेश

अ‍ॅडलेड : पुढील महिन्यात होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या चॅपेल-हेडली करंडक मालिकेसाठी हिल्टन कार्टराइटचा ऑस्ट्रेलियाच्या संघात आश्चर्यकारक समावेश करण्यात आला आहे.

झिम्बाब्वेत जन्मलेल्या आणि पश्चिम ऑस्ट्रेलियाकडून स्थानिक क्रिकेट खेळणारा हा अष्टपैलू खेळाडू १४ सदस्यीय संघातील एकमेव नवखा खेळाडू आहे. याशिवाय दुखापतीतून सावरलेला वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचाही ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून तो दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. याचप्रमाणे अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचे संघात पुनरागमन झाले आहे.

२४ वर्षीय कार्टराइटची स्थानिक क्रिकेटमधील कामगिरी लक्षणीय होती. त्यामुळेच त्याला संधी देण्यात आली आहे, असे निवड समितीचे प्रभारी प्रमुख ट्रॅव्हर हॉन्स यांनी सांगितले. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात ४ डिसेंबरला सिडनी, ६ डिसेंबरला कॅनबेरा आणि ९ डिसेंबरला मेलबर्न येथे सामने होणार आहेत.

ऑस्ट्रेलियाचा संघ

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जॉर्ज बेली, हिल्टन कार्टराइट, पॅट कमिन्स, जेम्स फॉकनर, आरोन फिन्च, ट्रॅविस हेड, जोश हॅझलवूड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मॅथ्यू वेड, अ‍ॅडम झम्पा.