रोमहर्षक सामन्यात बांगलादेशला १-१ असे बरोबरीत रोखले

कोलकाता : कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर मंगळवारी उपस्थित तमाम फुटबॉलप्रेमींना थरार अनुभवायला मिळाला. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात आक्रमणपटू आदिल खानने ८८व्या मिनिटाला हेडरद्वारे साकारलेल्या अप्रतिम गोलमुळे भारताने बांगलादेशला १-१ असे बरोबरीत रोखून घरच्या चाहत्यांसमोर पराभवाची नामुष्की टाळली.

सप्टेंबर महिन्यात आशियाई विजेत्या कतारला गोलशून्य बरोबरीत रोखणाऱ्या भारताने ‘ई’ गटातील या सामन्यात बरोबरी साधल्याने त्यांच्या खात्यात तीन सामन्यांतील दोन बरोबरी आणि एका पराभवासह दोन गुण जमा आहेत, तर क्रमवारीत भारतापेक्षा ८३ स्थानांनी पिछाडीवर असलेल्या बांगलादेशच्या नावावर तीन सामन्यांतून फक्त एक गुण जमा आहे.

भारताने नेहमीप्रमाणे सुरुवातीपासूनच आक्रमणावर भर दिला. परंतु गोल करण्यात त्यांना अपयश येत होते. भारतीय खेळाडूंकडून एकामागोमाग एक हल्ले होत असताना ४१व्या मिनिटाला गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूची चूक भारताला महागात पडली आणि त्याचा फायदा उचलून बांगलादेशच्या साद उद्दीनने संघासाठी पहिला गोल झळकावून संपूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरवली. मध्यंतरापर्यंत ही आघाडी फोडण्यात भारताला अपयश आले.

त्यानंतरही भारताने बरोबरी साधण्यासाठी अथक प्रयत्न केले. ५१व्या मिनिटाला झिबानने गोलजाळ्याच्या दिशेने भिरकावलेला चेंडू यावेळी गुरप्रीतने योग्यरित्या अडवल्याने बांगलादेशला दुसरा गोल करता आला नाही. ७१व्या आणि ७९व्या मिनिटाला सुनील छेत्रीने लगावलेल्या दोन फटक्यांपैकी एक गोलजाळ्याला लागून बाहेर गेला, तर एक बांगलादेशच्या गोलरक्षकाने थोपवून धरला. त्यामुळे भारताला पराभवाचे तोंड पहावे लागणार, असे चित्र जवळपास स्पष्ट झाले.

मात्र ८८व्या मिनिटाला ३१ वर्षीय आदिलने गोलजाळ्याच्या उजव्या दिशेने डोक्याहूनही काहीशा उंचीवर आलेल्या चेंडूला सुरेखरीत्या हेडर लगावून भारतासाठी गोल नोंदवला आणि खेळाडूंसह उपस्थित सर्व चाहत्यांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर भरपाई वेळेत कोणालाही दुसरा गोल साधता न आल्याने अखेरीस दोन्ही संघांना १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.