आठवडय़ाची मुलाखत

आदिल सुमारीवाला, भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष

तुषार वैती

महान धावपटू पी. टी. उषा आणि ललिता बाबर यांना पदकाने हुलकावणी दिल्यामुळे देशाला अद्यापही अ‍ॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदकाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. पण टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला अ‍ॅथलेटिक्समध्ये पदक नक्कीच मिळेल, असा विश्वास भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या (एएफआय) अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवडून आलेल्या आदिल सुमारीवाला यांनी व्यक्त केला.

अध्यक्षपदाची आव्हाने, करोनामुळे बिघडलेले स्पर्धाचे वेळापत्रक, भारतीय अ‍ॅथलेटिक्सला उंचावर नेण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न तसेच खेळाडूंपुढील समस्या यांविषयी सुमारीवाला यांच्याशी केलेली ही बातचीत –

* भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवडून आलात, या वेळी कोणती आव्हाने तुमच्यासमोर असतील?

भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ कुणावरही अवलंबून नाही. गेल्या आठ वर्षांपासून आम्ही भारतीय अ‍ॅथलेटिक्सला यशोशिखरावर कसे नेता येईल, याबाबतचा संपूर्ण आराखडा तयार केला असून त्यानुसार काम सुरू आहे. तळागाळातील खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना देशपातळीवर आणि नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व कसे करता येईल, याबाबतचे काम चोखपणे सुरू असल्यामुळे माझ्यासमोर आव्हाने तशी कमी आहेत. प्रशिक्षण, सोयीसुविधा योग्य रीतीने खेळाडूंना पुरवल्या जात आहेत. अ‍ॅथलेटिक्समधील खरी गुणवत्ता ही गावात असल्यामुळे त्यांचा शोध घेतला जात आहे. देशातील जवळपास ५२० जिल्हा संघटनांशी मी स्वत: बोललो असून तुम्ही काम केले तरच देशाला दर्जेदार खेळाडू मिळू शकतील, हा विश्वास त्यांच्यात रुजवला आहे. त्यामुळे जिल्हा-तालुका संघटनांना मजबूत करण्याचे काम आम्ही केले आहे.

* उपाध्यक्षपदी निवडून आलेल्या अंजू बॉबी जॉर्जच्या अनुभवाचा फायदा महासंघाला कसा होईल?

उंचउडीपटू अंजू ही जागतिक स्पर्धेत देशाला पदक मिळवून देणारी एकमेव खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धा तिने गाजवल्या आहेत. त्यामुळे याआधी कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केलेल्या अंजूच्या अनुभवाचा प्रचंड फायदा महासंघाला तसेच खेळाडूंना होणार आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंच्या गरजा काय आहेत, याची उत्तम जाण अंजूला आहे. त्यांना कोणत्या प्रकारे प्रशिक्षण, सोयीसुविधा द्यायला हव्यात, हे तिला पक्के ठाऊक असल्यामुळे यापुढे आमची बरीचशी चिंता मिटणार आहे.

* करोना कालखंडाचा खेळाडूंच्या मानसिकतेवर काय परिणाम झाला?

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंसाठी जैवसुरक्षित वातावरणात सराव शिबीर सुरू असून अंतर्गत स्पर्धाचे आयोजनही आम्ही करत आहोत. करोनाबाबतची परिस्थिती आणखीन सुधारली की देशात स्पर्धाचे आयोजनही सुरू होईल. जानेवारी महिन्यात देशातील स्पर्धा सुरू होणे अपेक्षित आहे. जगभरातील खेळाडूंप्रमाणेच देशातील अन्य खेळाडूंनाही करोनाचा फटका थोडय़ाफार प्रमाणात बसला असेल. मात्र आता कोणाच्याही मदतीची अपेक्षा न ठेवता त्यांनी आपला सराव सुरू करावा. सध्या करोनामुळे देशातील स्पर्धाचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडले असले तरी काही शर्यतींच्या आयोजनामुळे आता आशादायी चित्र दिसू लागले आहे.

* करोनाकाळात खेळाडूंकडून उत्तेजके घेण्याचे प्रमाण वाढले आहे का, याविषयी काय सांगाल?

उत्तेजक चाचण्या होण्याची गरज आहे. पण करोनामुळे जागतिक उत्तेजक विरोधी संस्था (वाडा) आणि राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था (नाडा) यांना चाचण्या घेणे शक्य नाही. १ डिसेंबपर्यंत कोणताही खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार नसल्यामुळे अशा प्रकारच्या चाचण्या आयोजित केल्या जाणार नाहीत. जगभरातील खेळाडूंमध्ये उत्तेजके घेण्याचे प्रमाण वाढल्याचे एका अहवालावरून समोर आले आहे. पण देशात जोपर्यंत उत्तेजक चाचण्या आयोजित केल्या जात नाहीत, तोपर्यंत काहीही सांगता येणार नाही. खेळाडूंनी उत्तेजकांचे सेवन केले आहे की नाही, हे चाचण्यांद्वारेच स्पष्ट होऊ शकेल.

* अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताचे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न टोक्योमध्ये पूर्ण होऊ शकेल का?

माझ्या अध्यक्षपदाच्या कालखंडात देशाला अ‍ॅथलेटिक्समध्ये पदक मिळावे, हे माझे एकमेव स्वप्न आहे. त्यासाठीची तयारी आणि प्रक्रिया सुरू आहे. देशाला ऑलिम्पिक पदक मिळवून देऊ शकणारे अनेक खेळाडू आपल्याकडे आहेत. त्यांची नावे आताच सांगता येणार नाहीत. मात्र धावण्याच्या शर्यती, भालाफेक, २० किमी चालण्याची शर्यत, उंचउडी या क्रीडा प्रकारात अनेक खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. हेच खेळाडू माझे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार करतील, असा विश्वास आहे.