मध्य प्रदेशमधील धरचा निवासी असलेल्या बॅडमिंटनपटू आदित्य जोशीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा रोवला आहे. १७ वर्षीय आदित्यने जागतिक कनिष्ठ क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबपर्यंत आदित्य क्रमवारीत अकराव्या स्थानी होता. मात्र सातत्यपूर्ण खेळ करत त्याने सर्व खेळाडूंना मागे टाकत १८,७७६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले.  
२००१मध्ये आदित्यने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली आणि अल्पावधीतच आपल्या कौशल्याची झलक पेश करत त्याने आपल्या अधिक वयोगटाच्या स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करून दाखवली. त्यानंतर अवघ्या सहा वर्षांत त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. २०११ मध्ये रशियात झालेल्या आंतरराष्ट्रीय कनिष्ठ स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्याच वर्षी त्याने आशियाई सबज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले होते.
गेल्या वर्षी मलेशियात झालेल्या आंतरराष्ट्रीय कनिष्ठ स्पर्धेत उपउपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती, तसेच बँकॉक येथे झालेल्या जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.
गेल्या महिन्यात चंदिगड येथे झालेल्या राष्ट्रीय कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपदावर कब्जा केला होता. पुणे येथे झालेल्या कनिष्ठ गटाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्णपदकांवर नाव कोरले होते. वरिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धेतही त्याने रौप्यपदकाची कमाई केली होती. आदित्यच्या कामगिरीवर समाधानी असल्याची भावना त्याचे प्रशिक्षक अमित कुलकर्णी यांनी व्यक्त केली. आदित्य आणि त्याचे समकालीन खेळाडू आगामी ऑलिम्पिकमध्ये दमदार प्रदर्शन करतील, असा विश्वास आदित्यचे वडील अतुल जोशी यांनी व्यक्त केला. लहानपणी त्याचे अभ्यासावरचे, खेळावरचे लक्ष ढळू नये, यासाठी घरी केबल टीव्हीचे कनेक्शनच बंद केल्याची आठवण आदित्यच्या आईने सांगितली.