चॅम्पियन्स लीग फुटबॉल

महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये बुधवारी मध्यरात्री बायर्न म्युनिक आणि मँचेस्टर सिटी यांनी आपापले सामने जिंकत बाद फेरीत आगेकूच केली.

रॉबर्ट लेवानडोव्हस्कीच्या चॅम्पियन्स लीगमधील ७१व्या गोलमुळे बायर्न म्युनिकने आरबी साल्झबर्ग संघाचा ३-१ असा पराभव केला. बायर्नचा हा चॅम्पियन्स लीगमधील सलग १५वा विजय ठरला. लेवानडोव्हस्कीने ४३व्या मिनिटाला बायर्नचे खाते खोलल्यानंतर किंग्सले कोमान आणि लेरॉय साने यांनी गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बायर्नने अ-गटातून १२ गुणांची कमाई करत अग्रस्थान पटकावले आहे.

मँचेस्टर सिटीने ऑलिम्पियाकोसला १-० असे हरवत अंतिम १६ जणांमध्ये स्थान मिळवले. मँचेस्टर सिटीने क गटात १२ गुणांसह दोन सामने शिल्लक राखून बाद फेरी गाठली. फिल फोडेनने १६व्या मिनिटाला केलेला गोल सिटीच्या विजयात निर्णायक ठरला.

लिव्हरपूलने मात्र बाद फेरी गाठण्याची संधी वाया घालवली. ड-गटात लिव्हरपूलला अ‍ॅटलांटाकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला. जोसिप इसिलिक आणि रॉबिन गोसेन्स यांनी गोल करत अ‍ॅटलांटाच्या विजयात योगदान दिले. इडेन हझार्ड आणि अचरफ हकिमी यांच्या गोलमुळे रेयाल माद्रिदने ब-गटात इंटर मिलानला २-० असे पराभूत करत विजयाची गाडी रूळावर आणली.