इडन गार्डन्सवर पहिल्याच दिवशी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची फलंदाजी पाहता यावी, यासाठी कोलकातावासियांनी एकच गर्दी केली होती. पण वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला असला तरी चाहत्यांची निराशा उत्सवमूर्ती सचिनने केली नाही. दोन षटकांमध्ये हातभर चेंडू वळवत त्याने एक बळी मिळवला आणि चाहत्यांनी हा क्षणही एखाद्या सणासारखा साजरा केला. सचिनबरोबर यावेळी पहिल्या दिवसाचे केंद्रबिंदू ठरला तो आपल्या घरच्याच मैदानात पदार्पण करत चार विकेट्सनिशी वेस्ट इंडिजवर शामत आणणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी. चार विकेट्स काढत शामीने वेस्ट इंडिजचे कंबरडे मोडले आणि त्यांचा पहिला डाव २३४ धावांमध्ये भारताला गुंडाळता आला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय सलामीवीरांनी बिनबाद ३७ अशी मजल मारत दिवस शांतपणे खेळून काढला.
नाणेफक जिंकत वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण तो त्यांना फळला नाही. कारण पहिल्या सत्रातच त्यांना दोन्ही सलामीवीरांना गमवावे लागले. तडाखेबंद सलामीवीर ख्रिस गेलने (१८) थोडी संयमी सुरुवात केली कारण त्याला शामी आणि भुवनेश्वर कुमार यांनी भंडावून सोडले होते. अखेर भुवनेश्वरने पुन्हा एकदा गेलला आपला बळी बनवला आणि भारताला पहिले यश मिळवून दिले. २ बाद ४७ या अवस्थेनंतर मालरेन सॅम्युअल्सने संघाचा आपल्या शैलीदार फलंदाजीच्या जोरावर सावरले आणि उपहारापर्यंत संघाला ३३ षटकांत १ बाद १०७ धावा अशी मजल मारून दिली.
दुसऱ्या सत्राची आश्वासक सुरुवात सॅम्युअल्स आणि डॅरेन ब्राव्हो (२३) यांनी केली. अर्धशतक झळकावत मोठय़ा खेळीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सॅम्युअल्सला शामीने त्रिफळाचीत करत भारताला मोठे यश मिळवून दिले.
सॅम्युअल्सने ११ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ६५ धावांची तडफदार खेळी साकारली. सॅम्युअल्स बाद झाल्यावर त्यानंतरच्याच षटकात शामीने ब्राव्होला धावचीत करत वेस्ट इंडिजला अजून एक धक्का दिला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. दोन स्थिरस्थावर फलंदाज बाद झाल्यावर शिवनारायण चंदरपॉलने (३६) संघाला सावरण्याची जबाबदारी उचलली आणि चहापानापर्यंत ती निभावली. चहापानापूर्वीच्या अखेरच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सचिनने शेन शेलिंडफोर्डला (५) बाद केले आणि स्टेडियममध्ये पुन्हा सचिन नामाच्या घोषाला सुरुवात झाली. या नादामध्येच संघ चहापानासाठी निघाला. चहापानापर्यंत वेस्ट इंडिजची ७ बाद १९२ अशी अवस्था होती.
तिसऱ्या आणि अखेरच्या सत्रामध्ये चंदरपॉल बाद झाल्यावर वेस्ट इंडिजचा डाव २३४ धावांमध्ये संपुष्टात आला. त्यानंतर १२ षटके खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय सलामीवीरांनी संयमी खेळी करत दिवस अखेर संघाला बिन बाद ३७ अशी मजल मारून दिली.
धावफलक
वेस्ट इंडिज (पहिला डाव) : ख्रिस गेल झे. विजय गो. कुमार १८, किरॉन पॉवेल झे. कुमार गो. शामी २८, डॅरेन ब्राव्हो धावचीत २३, मालरेन सॅम्युअल्स त्रि. गो. शामी ६५, शिवनारायण चंदरपॉल त्रि. गो. अश्विन ३६, दिनेश रामदिन त्रि. गो. शामी ४, डॅरेन सॅमी झे. कुमार गो. ओझा १६, शेन शिलिंगफोर्ड पायचीत गो. तेंडुलकर ५, वीरसामी पेरुमल झे. व गो. अश्विन १४, टिनो बेस्ट नाबाद १४, शेल्डॉल कॉटरेल त्रि. गो. शामी ०, अवांतर (बाइज ४, लेग बाइज ७) ११, एकूण ७८ षटकांत सर्व बाद २३४.
बाद क्रम : १- ३४, २-४७, ३-१३८, ४-१३८, ५-१४३, ६-१७२, ७-१९२, ८-२११, ९-२३३, १०-२३४.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १४-६-३३-१, मोहम्मद शामी १७-२-७१-४, आर. अश्विन २१-९-५२-२, प्रग्यान ओझा २४-६-६२-१, सचिन तेंडुलकर २-१-५-१.
भारत (पहिला डाव) : शिखर धवन नाबाद २१, मुरली विजय नाबाद १६, अवांतर ०, एकूण १२ षटकांत बिन बाद ३७.
गोलंदाजी : टिनो बेस्ट २-०-१५-०, शेल्डॉल कॉटरेल ५-२-१३-०, शेन शिलिंगफोर्ड ४-२-८-०, वीरसामी पेरुमल १-०-१-०.