ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. आतापर्यंत भारतीय महिला संघ एकदाही उपांत्य फेरीचा अडथळा पार करु शकलेल्या नाहीत. याआधी झालेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला इंग्लंडकडूनच उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या महिलांसमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. मात्र उपांत्य सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवलेला नाहीये. त्यातच दक्षिण आफ्रिकेचा ब गटातला विंडीजविरुद्धचा अखेरचा साखळी सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे उपांत्य सामन्यात पावसाने व्यत्यय आणला तर नेमका निर्णय कोणाच्या बाजूने लागणार…भारत की इंग्लंड??

आयसीसीच्या नियमांनुसार, टी-२० सामना खेळवण्यासाठी किमान ५ षटकं टाकलेली असणं गरजेचं आहे. मात्र आयसीसीच्या स्पर्धांमध्ये ही मर्यादा १० षटकांची आहे. त्यामुळे १० षटकांपेक्षा कमी खेळ झाल्यानंतर पावसाचं आगमन झालं तर सामना रद्द होऊ शकतो. मात्र भारतीय संघाने अ गटात आपलं अव्वल स्थान कायम राखल्यामुळे भारतीय महिलांना अंतिम फेरीचं तिकीट मिळू शकतं. हाच नियम दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यालाही लागू आहे. ब गटात आफ्रिकन महिला पहिल्या स्थानावर आहेत.