दिल्ली : भारतीय संघाच्या कामगिरीवर खूश असल्यामुळे मुख्य प्रशिक्षक आणि साहाय्यकांच्या करारात वाढ होण्याचा आग्रह काही दिवसांपुर्वी प्रशासकीय समितीने धरला होता. मात्र, भारतीय क्रिकेट  नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि प्रशासकीय समितीच्या झालेल्या बैठकीनंतर सर्व सूत्र हलली. असा कोणताच प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. त्यामुळे आगामी विश्व्चषक स्पर्धेनंतर नवीन प्रशिक्षकाचा शोध बीसीसीआय करणार असल्याच्या शक्यता बळावली आहे.

शास्त्री यांच्यासह गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण, फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचाही करार जुलै महिन्याच्या अखेरीस संपणार आहे. बीसीसीआयच्या बैठकीत रवि शास्त्री यांच्या कराराचा मुद्दा चर्चिला गेलेला नाही आणि तो चर्चेचा अजेंडात नव्हता, असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे विश्व्चषक स्पर्धेनंतर नवीन प्रशिक्षक निवडीच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

एका वृत्तानुसार विश्व्चषक स्पर्धेनंतर बीसीसीआय या पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध करणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला नवीन प्रशिक्षक मिळतील अशी शक्यात आहे. पण, प्रशिक्षकासाठी योग्य उमेदवार न मिळाल्यास विंडीज दौऱ्यापर्यंत शास्त्रींना मुदतवाढ देण्यात येईल.