News Flash

Afghanistan cricket team history : इतिहास

२०१५च्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानचा अ-गटात समावेश करण्यात आला.

Afghanistan cricket team history : इतिहास

तालिबान्यांनी ९०च्या दशकात अफगाणिस्तानमध्ये सर्व क्रीडा प्रकारांवर बंदी घातली होती. २०व्या दशकात हा विरोध मावळल्यानंतर क्रिकेट या एकमेव खेळाला तालिबान्यांनी परवानगी दिली. त्यानंतर पाकिस्तानसह अन्य क्रिकेट खेळणाऱ्या देशांच्या मदतीने अफगाणिस्तानची क्रिकेटमधील कारकीर्द सुरू झाली. २००१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) संलग्न देशांचा दर्जा लाभल्यानंतर अवघ्या दशकभराच्या कालावधीतच अफगाणिस्तानसारख्या दुबळ्या संघाने थक्क करणारी प्रगती केली आहे. २००८मध्ये २०११च्या विश्वचषक पात्रता फेरीत अफगाणिस्तान संघ अपयशी ठरला. मात्र चार वर्षांसाठी त्यांना एकदिवसीय दर्जा प्राप्त झाला. हीच काहीतरी करून दाखवण्याची वेळ अफगाणिस्तानकडे होती. २०११ ते २०१३ दरम्यान झालेल्या ‘आयसीसी’ जागतिक क्रिकेट लीग अजिंक्यपद स्पर्धेत अफगाणिस्तानने १४ पैकी ९ सामने जिंकत आठ देशांच्या गटात दुसरे स्थान पटकावले आणि २०१५च्या विश्वचषकात खेळण्याचा मान पटकावला. अफगाणिस्तानचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला तो २०१५च्या विश्वचषक स्पर्धेत. कारण २००३मध्ये ‘आयसीसी’चा सदस्य देशांचा दर्जा मिळूनही अफगाणिस्तानला २००७ आणि २०११च्या विश्वचषक स्पर्धेत मुख्य फेरीसाठी पात्र ठरता आले नव्हते.

२०१५च्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानचा अ-गटात समावेश करण्यात आला. या गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि स्कॉटलंड या संघांचा समावेश असल्यामुळे अफगाणिस्तानची डाळ शिजणे तसे कठीणच होते. पहिल्याच सामन्यात बांगलादेशकडून १०५ धावांनी दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतर अफगाणिस्तानचे मनोधैर्य खचणे स्वाभाविक होते. पण मैदानावर झोकून देऊन कामगिरी करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानने पुढच्या सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी झुंजवले. अफगाणिस्तानच्या २३३ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला ४९व्या षटकापर्यंत विजयासाठी वाट पाहावी लागली. त्यानंतरच्या रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तानने स्कॉटलंडचा एक गडी राखून पराभव करत विश्वचषकातील विजयी अभियानाचा प्रारंभ केला. स्कॉटलंडला २१० धावांवर रोखल्यानंतर जावेद अहमदी (५१) आणि समीउल्ला शिनवारी (९६) यांनी दमदार खेळी करत अफगाणिस्तानला विजयासमीप आणून ठेवले. मात्र अफगाणिस्तानचे सात फलंदाज एकेरी धावसंख्येवर माघारी परतल्यानंतर अखेरच्या जोडीने १९ धावा जोडत अफगाणिस्तानला तीन चेंडू राखून विजय मिळवून दिला.

विश्वचषकातील आपली ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर मात्र अफगाणिस्तानला त्या यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंडने अफगाणिस्तानला चारीमुंडय़ा चीत केले. सहा सामन्यांत एक विजय, पाच पराभवासह अफगाणिस्तानला अ-गटात सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

२०१५ विश्वचषकात १४ संघाच्या समावेशावर बरीच टीका झाल्यानंतर २०१९च्या विश्वचषक स्पर्धेत १० संघांचा समावेश करण्यात आला. त्यात यजमान इंग्लंड आणि ‘आयसीसी’ जागतिक क्रमवारीतील अव्वल सात देशांना थेट प्रवेश देण्यात आला. मात्र उर्वरित दोन जागांसाठी २०१८मध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरीसाठी १० देश एकमेकांशी भिडले. क्रमवारीत घसरण झाल्यामुळे दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजवरही पात्रता फेरीत खेळण्याची नामुष्की ओढवली. अ-गटात विंडीजने चारही संघांचा धुव्वा उडवला. मात्र ब-गटात अफगाणिस्तानला ‘सुपर-सिक्स’ फेरीसाठी संघर्ष करावा लागला. अवघ्या एका विजयासह दोन गुणांची कमाई करत अफगाणिस्तानने ब-गटात तिसरे स्थान पटकावून जेमतेम बाद फेरी गाठली. सुपर-सिक्स फेरीत अफगाणिस्तानने पहिल्याच सामन्यांत वेस्ट इंडिजचा तीन बळी राखून पराभव करत आपणही विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी प्रमुख दावेदार असल्याचे दाखवून दिले. गटात दुसरे स्थान पटकावल्यानंतर अफगाणिस्तानला अग्रस्थानावर असलेल्या वेस्ट इंडिजशी अंतिम झुंज द्यावी लागली. अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजला २०४ धावांवर रोखत अव्वल फिरकीपटू रशीद खानने एकदिवसीय क्रिकेटमधील १०० बळींची नोंद केली. त्यानंतर मोहम्मद शहझाद (८४) आणि रहमत शाह (५१) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने हे आव्हान सहज पार करत इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या २०१९ विश्वचषकाचे स्थान नक्की केले. २०१७मध्ये कसोटी क्रिकेटचा दर्जा लाभलेल्या अफगाणिस्तानकडून मोठय़ा कामगिरीची अपेक्षा बाळगली जात असतानाच हा संघ आता नामवंत संघांना धक्का देण्यासाठी सज्ज झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2019 1:54 am

Web Title: afghanistan cricket team history in icc world cup
Next Stories
1 इंग्लंडच्या जोस बटलरपासून सावधान!
2 भारतच विश्वचषकाचा दावेदार
3 World Cup 2019 : विराट एकटा काय करणार? – सचिन तेंडुलकर
Just Now!
X