विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर मंगळवारी अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे संघ आपले खाते उघडण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरतील.

शनिवारी झालेल्या लढतीत न्यूझीलंडने श्रीलंकेला १० गडी राखून नामोहरम केले. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांपुढे श्रीलंकेचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. कर्णधार दिमुथ करुणारत्ने वगळता एकाही फलंदाजाला ३० धावा करता आल्या नाहीत. त्यानंतर क्षेत्ररक्षणातसुद्धा त्यांनी कॉलिन मुन्रोला दिलेले जीवदान महागात पडले. मुन्रो (नाबाद ५८) आणि मार्टिन गप्टिल (नाबाद ७३) यांनी दिमाखदार फलंदाजी करत अवघ्या १६.१ षटकांत १३७ धावांचे आव्हान गाठले.

दुसरीकडे असंख्य जिगरबाज खेळाडूंचा भरणा असलेल्या अफगाणिस्तानला पहिल्याच सामन्यात बलाढय़ ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी जिद्दीने खेळ करत ऑस्ट्रेलियाला झुंज दिली. नजीबुल्लाह झादरान, रेहमत शाह यांनी झुंजार खेळ केला, तर रशीद खानने अष्टपैलू कामगिरीही केली; परंतु अनुभवी ऑस्ट्रेलियापुढे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांच्या अप्रतिम अर्धशतकांच्या बळावर कांगारूंनी अफगाणिस्तानला सात गडी राखून धूळ चारली. २०१५च्या विश्वचषकात श्रीलंकेने अफगाणिस्तानला पराभूत केले होते, त्याचा वचपा घेण्याची संधी या वेळी अफगाणिस्तानकडे आहे.

नबी, रशीदवर अफगाणिस्तानची मदार

एकदिवसीय क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या मोहम्मद नबीकडून अफगाणिस्तानला या वेळी चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, तर सध्याचा विश्वातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशीद खानपासून श्रीलंकेला सावध राहावे लागणार आहे. रशीद गोलंदाजीशिवाय फलंदाजीतही उपयुक्त योगदान देऊ शकतो.

सामन्यावर पावसाचे सावट

रविवारी कार्डिफला जोरदार पावसाच्या सरी बरसल्यामुळे या सामन्यावर पावसाचेच सावट कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मंगळवारीसुद्धा ९० टक्के पावसाची शक्यता दर्शवली असल्यामुळे चाहत्यांना

हिरमोड होऊ शकतो. न्यूझीलंड-श्रीलंका यांच्यातील सामन्याप्रमाणेच या लढतीतही वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून अधिक साहाय्य लाभेल.

कार्डिफमध्ये गेल्या २१ लढतींपैकी फक्त सहा सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे

पहिल्या सामन्यात आम्ही ऑस्ट्रेलियासारख्या विश्वविजेत्या संघाशी हरलो असलो तरी त्या सामन्यातदेखील काही सकारात्मक बाबी होत्या. प्रारंभी पडझड होऊनदेखील आम्ही दोनशे धावसंख्येच्या पल्याड पोहोचू शकलो. त्याप्रमाणेच जर फलंदाज लवकर बाद झाले नाही, तर अखेरच्या १० षटकांमध्ये आम्ही ८०-९० धावा करू शकतो. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळाडूंनी मन शांत ठेवून खेळण्याचा सल्ला मी त्यांना दिला आहे!

– गुलाबदीन नैब, अफगाणिस्तानचा कर्णधार

अफगाणिस्तान वि. श्रीलंका

स्थळ : कार्डिफ वेल्स स्टेडियम, कार्डिफ  ’सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स

सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १, स्टार प्रवाह मराठी.

संघ

अफगाणिस्तान : गुलाबदीन नैब (कर्णधार), मोहम्मद शहझाद, नूर अली झादरान, हझरतुल्ला झाझाई, रहमत शाह, असगर अफगाण, हशमतुल्ला शाहिदी, नजीबुल्ला झादरान, समीउल्ला शिनवारी, मोहम्मद नबी, रशीद खान, दौलत झादरान, आफताब आलम, हमीद हसन, मुजीब उर रहमान.

श्रीलंका : दिमुथ करुणारत्ने (कर्णधार) लसिथ मलिंगा, अविष्का फर्नाडो, लाहिरु थिरिमाने, कुसल परेरा, कुसल मेंडिस, अ‍ॅँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी’ सिल्व्हा, जेफ्री वॅँडरसे, थिसारा परेरा, इसुरू उडाना, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, जीवन मेंडिस, मिलिंदा सिरिवर्दना.

आमनेसामने

एकदिवसीय

सामने : ३, अफगाणिस्तान  : १, श्रीलंका : २, टाय / रद्द : ०

विश्वचषकात

सामने : १, अफगाणिस्तान : ०,

श्रीलंका : १, टाय / रद्द : ०