नवी दिल्ली : आमची फिरकी गोलंदाजी ही जागतिक दर्जाची असून आमचे गोलंदाज भारतीय संघाला आव्हान देण्यास सक्षम असल्याचा विश्वास अफगाणिस्तानच्या कसोटी संघाचा कर्णधार असगर स्टॅनिकझाईने व्यक्त केला. बेंगळुरुत १४ जूनपासून रंगणाऱ्या भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पाश्र्वभूमीवर असगर पत्रकारांशी बोलत होता.

अफगाणिस्तान संघाला कसोटी दर्जा प्राप्त झाल्यानंतर ते पहिलाच कसोटी सामना भारतासमवेत बेंगळुरुच्या चेन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार आहेत. ‘‘या कसोटी सामन्यात भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली खेळणार नसला तरी भारताचा संघ हा मजबूत असून विशेषत्वे घरच्या मैदानावर ते अधिकच दमदार कामगिरी करतात. त्यामुळे आमच्याविरुद्ध कोण खेळाडू खेळत आहेत, ते महत्त्वाचे नसून त्यांच्याविरुद्ध चांगली कामगिरी करणे इतकेच लक्ष्य आम्ही निश्चित केले आहे. आम्ही सामना जिंकण्यासाठीच खेळणार असून या सामन्यातून आम्हाला खूप मोठा अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे.’’ असे अफगाणिस्तानचा कर्णधार असगरने नमूद केले. अफगाणिस्तानचा संघ सध्या सरावासाठी नॉयडा येथे असून लवकरच ते डेहराडूनला रवाना होणार आहेत. त्याशिवाय पुढील महिन्याच्या पूर्वार्धात ते तीन ट्वेन्टी २० सामने खेळण्यासाठी बांगलादेशात जाणार आहेत.

अफगाणिस्तानच्या संघात फिरकी गोलंदाज राशिद खान, मुजीब झादरान आणि अष्टपैलू मोहम्मद नबी यांचा समावेश आहे. अफगाणिस्तानच्या खेळपट्टय़ादेखील भारताप्रमाणेच फिरकीला पोषक असल्याने तिथेदेखील एकाहून एक सरस फिरकीपटू तयार होत आहेत. त्याशिवाय त्यांच्या दावलत आणि शापूर झादरान हे १४० किमी प्रती तासापेक्षाही वेगाने गोलंदाजी टाकणारे गोलंदाज असून भारतीय संघाला मजबूत आव्हान देऊ, असा विश्वास स्टॅनिकझाईने व्यक्त केला.