बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात नवखा अफगाणिस्तानचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आला आहे. चौथ्या दिवसाच्या अखेरीस बांगलादेशची अवस्था १३६/६ अशी झाली होती. हा सामना जिंकण्यासाठी बांगलादेशला अजुनही २६२ धावांची आवश्यकता असून त्यांचे ४ फलंदाज शिल्लक राहिले आहेत. दुसऱ्या डावातही कर्णधार राशिद खानने ३ बळी घेत यजमान बांगलादेशला धक्का दिला आहे.

त्याआधी दुसऱ्या डावात अफगाणिस्तानचे फलंदाज फारशी झुंज देऊ शकले नाहीत. अफगाणिस्तानचा दुसरा डाव २६० धावांवर आटोपला. बांगलादेशकडून शाकीब अल हसनने ३ तर मेहदी हसन-तैजुल इस्लमा-नईम हसन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. बांगलादेशला विजयासाठी ३९८ धावांचं आव्हान देण्यात आलं.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या बांगलादेशची सुरुवात खराब झाली. सलामीवीर लिटन दास झहीर खानच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर शदमान इस्लामने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने फलंदाज माघारी परतत राहिले. राशिद खानने पुन्हा एकदा आपल्या फिरकीच्या जोरावर बांगलादेशच्या मधल्या फळीला दणके दिले. अखेरीस शाकीब अल हसनने सौम्या सरकारच्या साथीने डाव सावरत बांगलादेशचा पराभव अखेरच्या दिवशी ढकलला. त्यामुळे शेवटच्या दिवसात बांगलादेशचे फलंदाज किती काळ मैदानात तग धरुन राहतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.