देहरादूनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात खेळवण्यात येत असलेल्या आयर्लंड विरुद्ध अफगाणिस्तान टी-२० सामन्यात आज इतिहासाची नोंद झाली आहे. ३ गड्यांच्या मोबदल्यात २७८ धावांपर्यंत मजल मारत अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली आहे. या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलियन संघाचा २६३ धावांचा विक्रम मोडीत काढला. २०१६ साली श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाने या विक्रमाची नोंद केली होती.

हजरतउल्ला झजाई (६२ चेंडूत १६२ धावा) आणि उस्मान घानी (४८ चेंडू ७३ धावा) यांनी सलामीच्या जोडीसाठी २३६ धावांची भागीदारी रचत आणखी एका विक्रमाची नोंद केली. हजरतउल्लाच्या नाबाद १६२ धावा या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही आशियाई फलंदाजाने केलेल्या सर्वोत्तम धावा ठरल्या आहेत. अफगाणिस्तानने दिलेलं २७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडनेही चांगली लढत दिली. मात्र त्यांचा संघ २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १९४ धावांपर्यंत मजल मारु शकला. या विजयासह अफगाणिस्तानने ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.