आंतराष्ट्रीय क्रिकेट विश्वात अफगाणिस्तानने झेप मारली आहे. अफगाणिस्तानला २०१५ सालच्या विश्वचषकासाठीची पात्रता देण्यात आलेली आहे. जागतिक क्रिकेट लीग स्पर्धेत केनियाला नमवून अफगाणिस्तान संघाने दुसरे स्थान पटाकावून विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळविले आहे.
त्यामुळे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये २०१५ साली होणाऱया विश्वचषकामध्ये सहभागी होणाऱया संधीबरोबरच क्रिकेटमधील अव्वल संघांविरूद्ध खेळण्याची संधी अफगाणिस्तानला मिळाली आहे.
सामन्यात अफगाणिस्तानने केनियाला अवघ्या ९३ धावांत गुंडाळले. त्यानंतर अफगाणिस्तान संघाने हे लक्ष्य वीसाव्या षटकातच गाठले. या विजयामुळे अफगाणिस्तानची गुणसंख्या १९ झाली व संघाने दुसरे स्थान गाठले. त्यामुळे पहिल्या स्थानावरील आर्य़लंड आणि अफगाणिस्तान आता विश्वचषक खेळण्यासाठी पात्र झाले आहेत.