अफगाणिस्तानचे क्रिकेट पंच बिसमिल्ला जन शिनवारी यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. ३ ऑक्टोबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली. अफगाणिस्तानच्या नांगरहर प्रांतात झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात शिनवारी आणि त्यांच्या परिवारातील सात जणांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. अफगाणिस्तानमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, या बॉम्पस्फोटात एकूण १५ जणांनी आपले प्राण गमावले असून ३० पेक्षा जास्त लोकं जखमी झाले आहेत. नांगरहर प्रांतातील गवर्नर कंपाऊंड भागात हा स्फोट झाला.

३६ वर्षीय शिनवारी अफगाणिस्तानमध्ये स्थानिक सामन्यांमध्ये पंच म्हणून काम करायचे. याव्यतिरीक्त काही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही त्यांनी पंच म्हणून काम पाहिलं आहे. दुपारी १२ वाजून २० मिनीटांनी फुटीरतावादी गटाचे काही अतिरेकी गवर्नर कंपाऊंड भागात शिरण्याचा प्रयत्न करत होते. परंतू अफगाणी सैन आणि पोलिसांना त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. या धुमश्चक्रीत फुटीरतावादी गटातील अतिरेक्यांनी हा स्फोट केला ज्यात शिनवारी यांच्यासह १५ जणांनी आपले प्राण गमावले.