देहरादूनमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअममध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानने सहा गडी राखत बांगलादेशचा पराभव करत तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली आहे. रशीद खानने पुन्हा एकदा आपल्या फिरकीची कमाल दाखवत संघाला विजय मिळवून देत मालिका खिशात घातली. रशीद खानला मॅन ऑफ द मॅच देण्यात आला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्तानला १३५ धावांचं टार्गेट दिलं होतं.

सामन्यात अफगाणिस्तानचा गोलंदाज रशीद खानच्या फिरकीची जादू पुन्हा एकदा पहायला मिळाली. रशीदने चार ओव्हर्समध्ये १२ धावा देत चार विकेट्स मिळवल्या. रशीद खानच्या गोलंदाजीमुळे मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणारा बांगलादेश संघ २० ओव्हर्समध्ये आठ विकेट्स गमावत १३४ धावाच करु शकला.

अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील हा दुसरा टी-२० सामना होता. पहिला सामनाही अफगाणिस्ताननेच जिंकला होता. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. सलामी फलंदाज लिट्टन कुमार दास फक्त तीन धावा करुन आऊट झाला. यानंतर शब्बीर रहमान १३ धावांवर तंबूत परतला. समीउल्ला आणि मोहम्मद नाबी यांनी डाव सावरत संघाला १३४ धावा करुन दिल्या. समीउल्लाने ४९ तर मोहम्मद नाबी याने १५ चेंडूत ३१ धावा केल्या.

१० ओव्हर्समध्ये ८१ धावा करणारा बांगलादेश संघ पुढील १० ओव्हर्समध्ये फक्त ५३ धावा करु शकला. रशीद खानच्या फिरकीमुळे बांगलादेश मोठी धावसंख्या उभारु शकला नाही आणि विजयासाठी १३५ धावांचं आव्हान दिलं. अफगाणिस्तानने सहा गडी राखून विजय मिळवत बांगलादेशचा पराभव केला आणि २-० ने मालिकाही जिंकली. गुरुवारी तिसरा टी-२० सामना खेळवला जाईल.