आतापर्यंत ‘कच्चा लिंबू’ म्हणून समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानने यजमान बांगलादेशवर ऐतिहासिक निर्णय मिळवत आशिया चषकात धुमशान घातले असून त्यांचा सोमवारी सामना होणार आहे तो श्रीलंकेशी. आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये श्रीलंकेने विजय मिळवला असून हा सामना जिंकल्यास ते अंतिम फेरीचे दार उघडू शकेल. दुसरीकडे अफगाणिस्तानने श्रीलंकेला धक्का दिल्यास त्यांना पहिल्यांदाच अंतिम फेरी खुणावू शकण्याची शक्यता आहे.
 अफगाणिस्तानचे प्रशिक्षक कबीर अली यांनी स्पर्धेपूर्वीच आम्हाला विजयासाठी आसुसलो आहोत, असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी बांगलादेशला पराभूत करून दाखवलेही आहे. असगर स्टॅनिकझई आणि समिउल्लाह शेनवारी यांनी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात १६४ धावांची भागीदारी रचली होती, तर गोलंदाजांनीही भेदक मारा करत बांगलादेशच्या फलंदाजांना वठणीवर आणले होते.
श्रीलंकेला अफगाणिस्तानपेक्षा नक्कीच दांडगा अनुभव आहे. कुमार संगकारा आणि लहिरू थिरिमाने चांगल्या फॉर्मात आहेत. पण महेला जयवर्धने आणि अँजेलो मॅथ्यूज यांना अजूनही सूर गवसलेला नाही. गोलंदाजीमध्ये अजंथा मेंडिस आणि सचित्रा सेनानायके जोडीने दमदार कामगिरी केली आहे. श्रीलंकेचा संघ जर निष्काळजी राहीला नाही तर विजय त्यांचाच असेल.
वेळ : दुपारी १.३० वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट-३ वाहिनीवर.