भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सौहार्दाचा मार्ग २२ यार्डातून जातो, हे वाक्य बऱ्याचदा आपण ऐकतो. याचा अर्थ असा होता की, दोन्ही देशांमध्ये राजकीयदृष्टय़ा फारसे चांगले वगैरे वातावरण नाही. पण दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण क्रिकेट निर्माण करू शकते. पण जर असे असेल तर कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्यावर पाकिस्तामध्ये खळबळ का माजावी, हा खरा प्रश्न आहे.

पाकिस्तानमध्ये बॉलीवूडचे अमाप चाहते आहेत. बऱ्याच भारतातल्या गोष्टी आपल्याकडे याव्यात, असे त्यांना नेहमीच वाटते. भारताविरुद्ध क्रिकेट मालिका खेळवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळ नेहमीच तयार असते. क्रिकेटमधून दोन्ही देश जवळ येतात, असे म्हणायचे. पण भारतातल्या लोकांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल एखादे वाक्य बोलल्यावर आफ्रिदीविरुद्ध टीका व्हावी, याचिका दाखल केली जावी, यासारखे दुर्भाग्य नाही. पाकिस्तानचे माजी खेळाडू जावेद मियाँदाद यांनी तर आफ्रिदीच्या वक्तव्याची शरम वाटते, असे जाहीर विधान केले. खेळाडूंना संवेदना नसावी, असेच मियाँदाद यांना वाटत असावे. जे आफ्रिदीला वाटले ते तो मनापासून बोलला. यापुढे खेळाडूंनी मनातील भावना (खास करून भारताबद्दल) व्यक्त करू नये, असा फतवाच पाकिस्तानात निघाला तर त्याचे नवल वाटू नये. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पाहा. प्रत्येक वेळी तो मुत्सद्दीपणे बोलतो. त्याच्या बोलण्यामध्ये जिवंतपणा नसतो. खेळाडूंच्या खेळण्यात जसा प्रामाणिकपणा असतो तसा तो त्यांच्या बोलण्यात का असू नये, हादेखील एक मोठा प्रश्न आहे. या दोन्ही देशांमध्ये मैत्री वाढवण्यासाठी क्रिकेटचा उपयोग करायचे म्हटले जात असेल, तर आफ्रिदी नेमका कुठे चुकला हे कळत नाही. मग क्रिकेटच्या माध्यमातून मैत्री वाढण्याची भाषा ठेवून मनात द्वेष कायम असेल, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही.

मियाँदादने चेतन शर्माला मारलेला षटकार असो किंवा त्याच्या १९९२च्या विश्वचषकातल्या मर्कटलीला किंवा आमिर सोहेल-व्यंकटेश प्रसाद यांच्यामधील द्वंद्व असो, या साऱ्याचा आस्वाद एक चाहता म्हणून आपण साऱ्यांनी घेतला. पण तो तेवढय़ापुरताच. क्रिकेटच्या मैदानाबाहेर आपण मियाँदादच्या जिगरबाजपणाची स्तुतीही करतो. तसे पाकिस्तानमध्ये काही भारतीय खेळाडूंच्या बाबतीतही होताना दिसते. पण काही मंडळींना खुन्नस महत्त्वाची वाटते. दोन्ही देशांतील सामना म्हणजे एखादे युद्ध म्हणून पाहिले जाते. सामना आणि युद्ध यामधला फरक जाणवू नये, एवढा सूडभाव काहींच्या मनात खदखदत असतो. एक वेळ विश्वचषक जिंकला नाही तरी चालेल, पण या पारंपरिक प्रतिस्पध्र्याला धूळ चारा, अशी वक्तव्ये जेव्हा ऐकायला मिळतात, तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते.

क्रिकेटचा सामना आपण खेळ म्हणून पाहणार नसू तर तो खेळवण्यात तरी अर्थ आहे का? याचा विचार व्हायला हवा. तो पाहताना खेळभावना जोपासायला हवी, तरच सामन्याचा आनंद आपण घेऊ शकतो, अन्यथा आफ्रिदीवर भलामण करणाऱ्यांच्या यादीत आपणही असू!

-प्रसाद लाड