आगामी वर्षांत भारतीय स्थानिक क्रिकेटला आणखी एक सदस्य मिळणार आहे. बीसीसीआयने उत्तराखंडच्या रणजी संघाला मान्यता दिली आहे. यासोबत उत्तराखंडची १८ वर्षांची तपस्या अखेर फळाला आली आहे. उत्तराखंडमधील क्रिकेटची प्रगती पाहण्यासाठी बीसीसीआयने ९ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. आज पार पडलेल्या बीसीसीआयच्या बैठकीत क्रिकेट प्रशासकिय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी उत्तराखंडच्या रणजी संघाला मान्यता मिळण्याबाबतच्या वृत्ताला होकार दर्शवला आहे.

९ सदस्यीय समितीमध्ये सहा विविध राज्यांच्या संघटनांचे सदस्य, एक उत्तराखंड सरकारचा प्रतिनीधी, दोन बीसीसीआयच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. उत्तराखंड क्रिकेट संघटनेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये असणारे वाद आता मिटले आहेत. यानंतर सर्वानुमते उत्तराखंडच्या रणजीमधील सहभागाला हिरवा कंदील दर्शवला आहे. याआधी ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, नागालँड आणि मेघालय या ५ राज्यांनी आगामी रणजी करंडक स्पर्धेत आपला स्वतंत्र संघ उतरवणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आगामी काळात रणजी क्रिकेट स्पर्धा रंगतदार होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही.