ब्रिटनवर ३-१ अशा फरकाने मात; आता बेल्जियमचे आव्हान

टोक्यो : भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी ब्रिटनवर ३-१ असा शानदार विजय मिळवत ४९ वर्षांनंतर ऑलिम्पिक स्पध्रेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सामना संपल्याची शिटी वाजवल्यानंतर भारतीय हॉकीपटूंनी जल्लोष साजरा केला.

भारताच्या यशात दिलप्रीत सिंग (७व्या मिनिटाला), गरुजत सिंग (१६व्या मिनिटाला) आणि हार्दिक सिंग (५७व्या मिनिटाला) यांनी मैदानी गोलची नोंद केली. ब्रिटनकडून सॅम वॉर्डने एकमेव गोलची नोंद केली. येत्या मंगळवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताची विश्वविजेत्या बेल्जियमशी गाठ पडणार आहे. बेल्जियमने उपांत्यपूर्व सामन्यात स्पेनला ३-१ असे हरवून उपांत्य फेरीत स्थान मिळवले. दुसरी उपांत्य लढत ऑस्ट्रेलिया-जर्मनीमध्ये होणार आहे.

मेजर ध्यानचंद, बलबिर सिंग यांसारख्या मातब्बर हॉकीपटूंमुळे आठ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने अखेरचे सोनेरी यश मॉस्कोमध्ये १९८०मध्ये मिळवले होते. परंतु त्यावेळी

फक्त सहा संघांच्या समावेशामुळे उपांत्य लढत नव्हती. त्यामुळे त्याआधी १९७२च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये भारताने अखेरची उपांत्य फेरी गाठली होती. परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानने भारताचा २-० असा पराभव केल्याने भारताची वाटचाल खंडित झाली होती.

रविवारच्या सामन्यात ब्रिटनने सुरुवातीला भारताला उत्तम लढत देताना तिसऱ्याच मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर कमावला. पण भारताने तो प्रयत्न हाणून पाडला. मग सातव्या मिनिटाला सिमरनजीत सिंगने ब्रिटनच्या बचाव फळीला चकवून दिलेल्या पासवर दिलप्रीतने भारताचे खाते उघडले. दोन मिनिटांनंतर भारताचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने गोल वाचवला. मग दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच गरुजतच्या गोलच्या बळावर भारताने आपली आघाडी मध्यांतराला २-० अशी वाढवली.

तिसऱ्या सत्रात हार्दिकने गोलची संधी निर्माण केली. परंतु गरुजतला गोल करण्यापासून ब्रिटनचा गोलरक्षक ऑलिव्हन पेनीने रोखले. मग गरुजतचा आणखी एक प्रयत्न अयशस्वी ठरला. या सत्राच्या उत्तरार्धात ब्रिटनला चार सलग पेनल्टी कॉर्नर मिळाले. यापैकी चौथ्या प्रयत्नात वॉर्डने ब्रिटनचा पहिला गोल नोंदवला.

अखेरच्या सत्रात पिछाडीवरील ब्रिटनने अधिक आक्रमक खेळ केला. त्यांच्या या प्रयत्नांना तीन पेल्टी कॉर्नरचे यशही मिळाले. परंतु श्रीजेशने हे प्रयत्न हाणून पाडले. त्यानंतर ५७व्या मिनिटाला हार्दिकने गोलरक्षक पेनने पहिल्या प्रयत्नात चेंडू परतवल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात गोल झळकावला. उर्वरित तीन मिनिटांत ब्रिटनचे सामना वाचवण्याचे केविलवाणे प्रयत्न अपयशी ठरले.

ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वीच यंदा आम्ही उपांत्य फेरीपर्यंत नक्कीच धडक मारू, याची प्रत्येकाला खात्री होती. या विश्वासाचे मैदानावर कामगिरीत रुपांतर केल्याचा आनंद आहे. मात्र आमचे अंतिम लक्ष्य अद्याप दूर असून बेल्जियमला नमवण्यासाठी सर्वस्व पणाला लावू.

– मनप्रीत सिंग, भारताचा कर्णधार