सचिनला भलेही ‘क्रिकेटमधील देव’ म्हटले जाते, परंतु त्याच्याही कारकिर्दीत एक वाईट काळ आला होता. त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ अपयशी ठरत होता, तेव्हा तो अक्षरश: उद्ध्वस्त झाला आणि आपल्या आवडत्या खेळाला अलविदा करण्याच्या बेतात होता. गेल्या वर्षी सचिनने क्रिकेटमधून समाधानाने निवृत्ती पत्करली, तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक विक्रम त्याच्या नावावर होते. अडीच दशकांच्या आपल्या कारकिर्दीतील कठीण काळातून आपण कसे तावून सुलाखून बाहेर पडलो, हे सांगताना सचिन भावुक झाला होता.
‘प्लेइंग इट माय वे’ हे सचिनचे आत्मचरित्र ६ नोव्हेंबरला जगभरात प्रकाशित होणार आहे. क्रीडा पत्रकार बोरिया मझुमदार या पुस्तकाचे सहलेखक आहेत. सचिन आपल्या आवडत्या खेळालायच सोडायला कसा तयार झाला होता, हे या पुस्तकात त्याने मांडले आहे, कारण कर्णधारपदाच्या कालखंडात तो अतिशय खचला होता.
‘‘अपयशाने मी त्रस्त झालो होतो आणि कर्णधार म्हणून संघाच्या कामगिरीला मी व्यक्तिश: जबाबदार होतो. मी माझ्या वतीने सर्वोत्तम प्रयत्न करीत होतो, परंतु कोणतीही गोष्ट मनासारखी घडत नव्हती. त्यामुळे चिंता आणखी वाढत होती,’’ असे सचिनने सांगितले.
‘‘पराभवांच्या लाटांमध्ये माझे गलबत हेलकावे खात होते. अतिशय रोमहर्षक सामने काही फरकाने आम्ही गमावले, माझ्या भीतीमध्ये त्यामुळे भर पडत गेली; परंतु काहीच सकारात्मक घडत नव्हते. पत्नी अंजलीने माझा आत्मविश्वास वाढवण्याचे कार्य केले,’’ असे तो पुढे म्हणाला.
१९९७मध्ये भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर गेला होता. पहिले दोन कसोटी सामने अनिर्णीत राहिल्यावर तिसरी कसोटी जिंकण्यासाठी भारताला फक्त १२० धावांची गरज होती; परंतु भारतीय फलंदाजी फक्त ८० धावांत अनपेक्षितपणे कोसळली. फक्त व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने दोन आकडी धावा काढल्या.
‘‘सोमवार, ३१ मार्च १९९७ हा भारतीय क्रिकेट इतिहासातील काळा दिवस ठरला. माझ्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीतील एक वाईट दिवस म्हणून मी नमूद करेन. आदल्या रात्री बार्बाडोसमधील सेंट लॉरेन्स गॅप रेस्टॉरंटमध्ये भोजनाला गेलो असताना एका वेटरने वेस्ट इंडिज उद्या जिंकणार, असे भाकीत केले होते. पुढील दिवशी कर्टली अ‍ॅम्ब्रोजच्या वेगवान माऱ्यापुढे भारतीय संघ शरणागती पत्करेल, याबाबत त्याला खात्री होती,’’ असे सचिनने आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.
‘‘भारताच्या खराब फलंदाजीच्या प्रयत्नांचे अजिबात समर्थन करता येणार नाही. भारतीय फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्यामुळे वेस्ट इंडिजने ३८ धावांनी विजय संपादन केला. मी या पराभवासाठी कोणालाही जबाबदार धरणार नाही, कारण ती माझी पद्धत नाही. मी संघाचा भाग होतो आणि कर्णधार म्हणून संघाला विजयासमीप नेणे ही माझी जबाबदारी होती. आमचा अतिआत्मविश्वास नडला, असे मला वाटत नाही,’’ असे त्याने या पुस्तकात पुढे म्हटले आहे.