एच. एस. प्रणॉयला कारणे दाखवा नोटीस

नवी दिल्ली : भारताचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्याची खेलरत्न क्रीडा पुरस्कारासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेकडून (बीएआय) शिफारस करण्यात आली आहे. याउलट अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस न झाल्याने जाहीर नाराजी व्यक्त करणाऱ्या प्रणॉयला संघटनेकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.

मनिला येथे फेब्रुवारीमध्ये झालेल्या आशिया सांघिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न खेळता श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय हे दोघेही बार्सिलोना येथे अन्य स्पर्धा खेळण्यासाठी निघून गेले. या कृत्याबद्दल श्रीकांतने दिलगिरी व्यक्त केली आहे. त्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा संघ पराभूत झाला होता. ‘‘श्रीकांतने त्याची चूक मान्य करत असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र प्रणॉय सातत्याने शिस्तभंग करत आहे. आतापर्यंत प्रणॉयच्या वागण्याकडे संघटनेकडून दुर्लक्ष करण्यात आले, मात्र या वेळेस त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे,’’ असे ‘बीएआय’चे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी सांगितले.