डॉ. निखिल लाटे यांचे प्रतिपादन

मुंबई : टोक्यो ऑलिम्पिकला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंपैकी जवळपास १५ ते २० टक्के खेळाडूंना करोनाची बाधा होऊन गेली आहे. करोनाच्या उपचारात उत्तेजक संप्रेरकांचे म्हणजेच स्टेरॉइड्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असले तरी जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या (वाडा) नियमावलींचे उल्लंघन होणार नाही, असा दावा डॉ. निखिल लाटे यांनी केला आहे.

गेले दीड वर्षे जगातील अनेक क्रीडापटूंना करोनाची बाधा झाली आहे. परंतु त्यांच्या उपचारामुळे उत्तेजक नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे एकही प्रकरण समोर आलेले नाही, याकडे डॉ. लाटे यांनी लक्ष वेधले. टोक्यो ऑलिम्पिकला अडीच महिन्यांचा अवधी बाकी आहे.  याबाबत डॉ. लाटे म्हणाले, ‘‘उपलब्ध कालावधीत एखाद्या खेळाडूला लागण झाली, तरी त्याला सावरून स्पर्धेत सहभागी होणे कठीण जाणार नाही. याशिवाय ऑलिम्पिकला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंचे १०० टक्के लसीकरण होणार आहे.’’

करोनाविषयक उपचार पद्धतीमुळे ‘वाडा’च्या नियमांचे उल्लंघन होण्याचा धोका आहे का, याबाबत विश्लेषण करताना डॉ. लाटे म्हणाले की, ‘‘भारतात करोना उपचार पद्धतीत येणारी क, ड जीवनसत्त्वांची औषधे पुरकांच्या यादीत येतात. उत्तेजकांच्या यादीत नव्हे. वैद्यकीय क्षेत्रात करोनाविषयक उपचार पद्धतीबाबत दररोज जागतिक स्तरावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे या संशोधनांबाबत आणि उपचारांबाबत आदानप्रदान सुरू असते. त्यामुळे वैद्यकीय शिष्टाचार मोडून एखाद्या देशात वेगळे प्रयत्न होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या यादीतील उत्तेजक संप्रेरके कुणी देईल, असे वाटत नाही.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘करोनाविषयक उपचारातील उत्तेजक संप्रेरके हे कामगिरी उंचावणारे किंवा स्नायूंची वाढ करणारे नाही. त्यामुळे ‘वाडा’च्या उत्तेजक कक्षेत ते येत नाही.’’

…तर बंदी असलेल्या उत्तेजकांचाही वापर!

कोणत्याही खेळाडूवर उपचार करण्यासाठी बंदी घातलेले उत्तेजक पदार्थाचा सर्वाेत्तम पर्याय असेल, तर त्याच्या सेवनाची परवानगी दिली जाते, असे डॉ. लाटे यांनी सांगितले. ‘‘बरेचसे खेळाडू सांध्यांमध्ये उत्तेजक संप्रेरकांची मात्रा घेतात, त्याला परवानगी आहे. अस्थमाच्या उपचारात दिल्या जाणाऱ्या उत्तेजक संप्रेरकांचाही बंदी घातलेल्या उत्तेजकांमध्ये समावेश केलेला नाही,’’ असे डॉ. लाटे यांनी सांगितले.