करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका भारतीय क्रीडा क्षेत्रालाही चांगलाच बसला आहे. बीसीसीआयने आयपीएलसह महत्वाच्या स्थानिक स्पर्धाही रद्द केल्या आहेत. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा आता १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. करोनामुळे भारतात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी हा निर्णय घेतला.

अवश्य वाचा – करोनाबद्दल अफवा पसरवू नका, सुरेश रैनाचं चाहत्यांना आवाहन

स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यामुळे चेन्नई सुपरकिंग्जने सर्वातप्रथम आपला ट्रेनिंग कँप रद्द केला. यानंतर रॉयलल चॅलेंजर्स बंगळुरु संघानेही आपला २१ मार्चपासून सुरु होणारा ट्रेनिंग कँप रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंची सुरक्षा महत्वाची असल्याचं, RCB च्या संघ व्यवस्थापनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जाहीर केलं आहे.

देशात सध्या करोनाबाधित रुग्णांचा आकडा शंभरीपार गेला आहे. महाराष्ट्रात एका रुग्णाला करोनामुळे आपले प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे आगामी काळात सरकारी यंत्रणा करोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.