भारत-इंग्लंड कसोटी सामन्यासाठी ईडन गार्डन्सची खेळपट्टी तयार करण्याचा वाद शनिवारी दिवसभरातील नाटय़मय घडामोडींनंतर तूर्तास शमला आहे. अनुभवी क्यूरेटर प्रबिर मुखर्जी यांनी वैद्यकीय रजेवर जाण्याचा इशारा दिल्यानंतर वातावरण तंग झाले होते. पण क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (कॅब) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी शिष्टाई करून सध्या तरी मुखर्जी यांना राजी केले आहे.
भारत-इंग्लंड यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याची खेळपट्टी तयार करण्यापासून मुखर्जी यांना दूर ठेवल्यानंतर मुखर्जी यांनी शनिवारी सकाळी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालला छोटेखानी पत्र लिहीत वैद्यकीय रजेवर जात असल्याचे कळविले होते. १९८५पासून ईडन गार्डन्सची खेळपट्टी मुखर्जी तयार करतात.
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देणारी खेळपट्टी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत हवी आहे. या हट्टापायी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ८३ वर्षीय मुखर्जी यांना हटविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पूर्व विभागाच्या मैदान आणि खेळपट्टी समितीचे प्रतिनिधी आशिष भौमिक यांना ईडन गार्डन्सची खेळपट्टी फिरकीला अनुकूल करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. ४८ तासांच्या आत या साऱ्या नाटय़मय घटना घडल्या होत्या. पण त्यानंतर हे प्रकरण हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच दालमिया यांनी मुखर्जी यांचे मन वळविण्यात यश मिळविले आहे.
‘‘सध्या कोणताही वाद नाही. आता मतभेद शमले आहेत. प्रबिर मुखर्जी हेच ईडन गार्डन्सचे क्यूरेटर असतील. ५ डिसेंबरपासून सुरू होणारा इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना आणि ३ जानेवारीला होणारा पाकिस्तानविरुद्धचा एकदिवसीय सामना यासाठी मुखर्जी हेच क्युरेटर म्हणून काम पाहतील,’’ असे बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दालमिया यांनी सांगितले.
भौमिक यांची नियुक्ती केल्यानंतर मुखर्जी यांनी ‘‘हा माझा अपमान आहे,’’ अशा शब्दांत आपल्या वेदना सकाळी प्रकट केल्या. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या या भूमिकेबाबत मुखर्जी यांनी आपली नाराजी व्यक्त केली. खेळपट्टीबाबत काहीही वक्तव्य केल्यास नोकरीवरून बडतर्फ करण्यात येईल, अशा प्रकारची धमकी आपल्याला दिल्याचेही मुखर्जी यांनी सांगितले.
‘‘कुठेही अध्यक्ष खेळपट्टींबाबत भाष्य करीत नाहीत. पण बंगालमध्ये ते मला खेळपट्टीविषयी बोलल्यास नोकरीवरून काढण्याची धमकी देत आहेत. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालची दोन दशके चाकरी करणाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारची वागणूक दिली जात आहे,’’ असे मुखर्जी यांनी सांगितले.
धोनीने कोलकाता कसोटी सामन्यासाठी पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीची मागणी केली होती. दोन खेळपट्टय़ा कधीही समान नसतात, त्यामुळे अशा प्रकारची मागणी करणे तर्कसिद्ध नसल्याचे मुखर्जी यांनी स्पष्ट केले होते. या कारणास्तव बीसीसीआयने मुखर्जी यांना बाजूला करून भौमिक यांच्याकडे खेळपट्टीची जबाबदारी सोपविली होती.
‘‘या परिस्थितीत ‘कॅब’ माझ्या पाठीशी राहील, अशी माझी अपेक्षा होती, परंतु त्यांनी माझा हिरमोड केला. शुक्रवारी रात्री रक्तदाब वाढला होता. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी मला महिनाभर विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मी माझा वैद्यकीय अहवाल ‘कॅब’ला पाठवून महिन्याभरासाठी वैद्यकीय रजेची विनंती केली आहे,’’ असे मुखर्जी यांनी सांगितले.
‘‘मी पैसे कमविण्यासाठी खेळपट्टय़ा तयार केल्या नाहीत. मी २००४मध्ये बांगलादेशला झालेल्या १९ वर्षांखालील आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठीही खेळपट्टय़ा बनविल्या होत्या, पण त्याचा एक छदामही मला मिळाला नाही. क्रिकेट हेच माझे सर्वस्व आहे, त्यामुळेच मी ईडन गार्डन्सची इतकी वष्रे सेवा करू शकलो,’’ असे मुखर्जी या वेळी म्हणाले.