रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून वाढत्या प्रदुषणामुळे खालावलेली हवेची पातळी हा चर्चेचा मुद्दा बनलेला आहे. याच कारणासाठी पहिल्या टी-२० सामन्याचं ठिकाण बदलण्याची मागणी करण्यात येत होती. बीसीसीआयने सामन्याचं ठिकाण बदलण्यास नकार दिल्यानंतर सामना वेळापत्रकानुसार पार पडला. यानंतर दुसऱ्या टी-२० सामन्यावरही काळे ढग तयार झाले आहेत.

७ नोव्हेंबरला रोहित शर्माचा भारतीय संघ राजकोटच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध दोन हात करेल. मात्र याच कालावधीत अरबी समुद्रात ‘महा’नावाचं चक्रीवादळ येणार असल्यामुळे या दिवशी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिव-दमण, वेरावल परिसरात या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू असल्यामुळे या काळात गुजरातमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाचे संचालक जयंत सरकार यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली.

६ आणि ७ नोव्हेंबर हे दोन दिवस गुजरातमधील किनारपट्टीभागासाठी महत्वाचे ठरणार आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे या दोन दिवसांमध्ये किनारपट्टीलगतच्या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समालोचक हर्षा भोगले यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबद्दल काळजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरल्यास दुसरा सामना पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बांगलादेशने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे, त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांत भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.