News Flash

सचिनयुगाच्या अस्तानंतर…

पाहता पाहता सचिनयुगाच्या अस्ताला वर्ष झालं. सचिननंतर काय?

| November 16, 2014 07:33 am

पाहता पाहता सचिनयुगाच्या अस्ताला वर्ष झालं. सचिननंतर काय? हा प्रष्टद्धr(२२४)ष्टद्धr(१३८) तेव्हाही होता. तसाच तो आजही विचारला जातो. पण या कालखंडात बरेच काही घडले. क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक व्यापक आणि सकारात्मक बदल झाले. ते क्रिकेटेतर खेळांसाठी अपेक्षा उंचावणारे ठरत आहेत.

गेल्या नोव्हेंबरमधले ते तीन दिवस. ते अविस्मरणीय क्षण. सचिनने त्याच्या कारकिर्दीतील अखेरच्या कसोटीत साकारलेली ती ७४ धावांची यादगार खेळी. ‘अखेरच्या श्वासापर्यंत कानात सचिन, सचिन हा नाद घुमत राहील,’ अशा शब्दांत त्याने केलेले आभाराचे, निरोपाचे भाषण. मैदानाला नमस्कार करून दिलेला हृद्य धन्यवाद.. आणि कोटय़वधी क्रिकेट-चाहत्यांच्या डोळ्यांत उभे राहिलेले अश्रू..
पाहता पाहता सचिनयुगाच्या अस्ताला वर्ष झालं. सचिननंतर काय? हा प्रश्न तेव्हाही होता. तसाच तो आजही विचारला जातो. पण या कालखंडात बरेच काही घडले. क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक व्यापक आणि सकारात्मक बदल झाले. ते क्रिकेटेतर खेळांसाठी अपेक्षा उंचावणारे ठरत आहेत.
चित्रपट क्षेत्रात राजेश खन्नाला पहिला सुपरस्टार मानतात, त्यानंतर अमिताभ बच्चन. तसा क्रीडा क्षेत्रातला पहिला महानायक होता लिटिल मास्टर सुनील गावस्कर. त्यानंतर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर. क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारे हे दोघंही मुंबईकर. १९८७मध्ये गावस्कर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. तेव्हा नवा महानायक कोण, हा प्रश्न सर्वानाच पडला होता. पण पुढच्याच वर्षी हॅरिस शिल्ड क्रिकेट स्पध्रेत सचिननं ३४६ धावांची विक्रमी खेळी आणि विनोद कांबळीसोबत ६६४ धावांची मॅरेथॉन भागीदारी केली आणि भारताला नव्या महानायकाचा शोध लागला. सचिनचा जन्मच जणू आपल्या फलंदाजीनं क्रिकेटवर राज्य करण्यासाठी झाला होता, विक्रम मोडण्यासाठी झाला होता. १९८९मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्यानं आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. त्यापुढची तब्बल २४ वष्रे आपण फक्त त्यानं चितारलेल्या विविधरंगी कलाकृतींनी मुग्ध होत होतो. त्याची बॅट तळपली की आनंद आणि तो बाद झाला की निराशा, हे भावनांचे हिंदोळे अनुभवत होतो. आपल्या मुलाला सचिनसारखा क्रिकेटपटू घडवण्याची स्वप्ने जोपासून पालक त्यांना – प्रसंगी मारूनमुटकून – क्रिकेटचा लळा लावत होते. सचिननं क्रिकेटचा प्रवास सुरू केला, तेव्हा जमाना होता २१ इंचांच्या रंगीत टीव्हीचा. तो निवृत्त झाला, तेव्हा ४२ इंचांच्याही पुढे मजल जाऊन एलसीडी, एलईडी आणि थ्रीडीपर्यंत  तंत्रक्रांती झाली होती. सचिनचं गारूड मात्र कायम होतं. प्रसारमाध्यमांनी सचिन अपयशी होतोय, त्याचा त्रिफळाच उडतोय, शतकांचं शतक त्याला साकारता येत नाही, असा आरडाओरड करीत त्याच्यामागे निवृत्तीचा तगादा लावला. परंतु तरीसुद्धा भारताचा सामना आणि सचिनचं फलंदाजीचं महानाटय़ पाहण्याची ओढ रसिकमानसात अखेरच्या सामन्यापर्यंत टिकून होती. अखेर विक्रमांचे अनेक इमले बांधून या महानायकानं अलविदा केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा साऱ्यांनी नव्या भक्तिभावाने पुढच्या महानायकाचा शोध सुरू केला. सचिनचे विक्रम एक भारतीय क्रिकेटपटूच मोडेल, अशी भविष्यवाणी सचिनच्या मावळतीच्या काळात गावस्कर यांनी केली होती. भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं ‘अँग्री यंग मॅन’ अशी छाप पाडणारा विराट कोहली यांच्यात आपण ‘उद्याचा सचिन’ पाहत होतो. परंतु सचिनच्या निवृत्तीला वर्ष झालं, तरी तो महानायक काही सापडलेला नाही. धोनीच्या फलंदाजीतलं आणि नेतृत्वातलं असातत्य प्रकर्षांनं समोर येऊ लागलं आहे. ‘विराट’ अपेक्षा असलेला कोहली धावांसाठी झगडत आहे, तर कधी आत्मविश्वासानं धावा काढत आहे. त्याच्या फलंदाजीवर अनुष्का शर्मा भलेही फिदा असेल, क्रीडारसिकांवर मात्र अजून त्याची मोहिनी पडलेली नाही. उलट चर्चा होत आहे ती त्याच्या नि अनुष्काच्या प्रेमप्रकरणाची आणि त्यामुळे त्याच्या फलंदाजीवर होणाऱ्या परिणामांची. नेमक्या याच काळात स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणानं क्रिकेट डागाळलं. क्रिकेटमधील या दुष्कर्मात आणखी कोण गुंतलंय, हे लवकरच समोर येईल. मोठय़ा खेळाडूंवरील संशय आणि क्रिकेट प्रशासनाचे हितसंबंध यामुळे खेळाचा खोलवर रुजलेला पायाच खिळखिळा झाला आहे. ‘सभ्य लोकांचा खेळ’ असं ज्या क्रिकेटला म्हणतात, त्या खेळातील सचिन हा आदर्श पुरुष मानला जायचा. त्याच्यानंतर अशा प्रकारे नवा कोणताच खेळाडू तळपलेला नाही. या सर्व गोष्टींमुळे सचिनच्या निवृत्तीनंतर क्रीडारसिक आणि क्रिकेट यांच्यातील भावनिक नात्याच्या आलेखाचा प्रवास अधोमार्गाने सुरू झाला आहे. भारताची वेस्ट इंडिजशी आणि श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका सुरू असताना, आज क्रिकेटचा सामना आहे, याची फारशी दखल घ्यावीशी न वाटणाऱ्यांची संख्या मोठी होती, हे त्याचेच द्योतक.
सचिन क्रिकेट खेळत होता, तेव्हा विविध खेळांमध्ये बॉक्सिंग लीग, हॉकी लीग, कबड्डी प्रीमियर लीग अशा अनेक अपयशी लीग झाल्या, अनेक खेळाडूंनी आणि खेळांनी देदीप्यमान यश मिळवलं. परंतु भारतीय क्रीडारसिकांच्या सचिनप्रेमापायी ते सारं झाकोळलं गेलं. सचिनपर्व संपल्यानंतर मात्र क्रिकेटकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच जणू बदलला. क्रिकेटपायी वेडे होणाऱ्यांची संख्या आजही कमी नाही. पण त्याचबरोबर क्रिकेटमध्ये शिरलेल्या अपप्रवृत्तीने त्यापासून दुरावत चाललेल्यांचीही संख्या प्रचंड आहे. त्याचाच फायदा बहुधा अन्य खेळांना झाला असावा. त्याशिवाय सचिनयुगानंतरच्या क्रिकेटची घसरती लोकप्रियता आणि अन्य खेळांभोवती निर्माण झालेले चुंबकत्व याची संगती लावताच येणार नाही. ऑगस्टमध्ये प्रो-कबड्डी लीगसारखी कबड्डी या देशी खेळाची स्पर्धा अनपेक्षितपणे लोकप्रिय झाली. राकेश कुमार, अनुप कुमार, जसबीर सिंग, अजय ठाकूर यांसारख्या कबड्डीपटूंना लोक ओळखू लागले. त्यांनाही नायकत्व मिळालं. स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलचा चाहतावर्ग कमालीचा वाढला. तिनं आपला खेळ आणि ग्लॅमर दोन्ही जपलं. सानिया मिर्झा कारकिर्दीच्या प्रारंभी चमकली. पुढे टेनिसच्या महिला एकेरीत पहिल्या फेरीत विजय आणि दुसरीत पराजय हे जणू ठरूनच गेल्यासारखे झाले. सौंदर्य आणि फॅशन हीच तिची टेनिसमधील ओळख राहते की काय असे वाटत असतानाच ती आता दुहेरीत एकापाठोपाठ जेतेपदे जिंकू लागली आहे. भारताला हमखास पदक जिंकून देऊ शकणारी खेळाडू म्हणूनसुद्धा आता जशी ती दखलपात्र झाली आहे, तसंच तिच्यावर भारतीय क्रीडारसिकांवरचं प्रेमसुद्धा वाढलं आहे. ‘पाकिस्तानची सून’ असं हिणवणाऱ्यांना तिनं आपल्या खेळातून प्रत्युत्तर दिलं आहे. लिएण्डर पेस, महेश भूपती आणि रोहन बोपण्णा नसतानाही आशियाई क्रीडा स्पध्रेत नव्या दमाच्या खेळाडूंनी मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे. सायना नेहवाल यशासाठी उत्सुक आहे. तिचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्याशी चालू असलेली धुसफुस समोर येत आहे, पण तो भाग वेगळा. दुसरीकडे पारुपल्ली कश्यप, पी. व्ही. सिंधू असे अनेक तारे आता नभांगणात आशादायी चित्र निर्माण करीत आहेत. गेली अनेक वष्रे अश्वत्थाम्याप्रमाणे अपयशाचा शिक्का माथी घेऊन फिरणाऱ्या हॉकीला आता चांगले दिवस आले आहेत. इन्चॉनला आशियाई सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघानं नुकतंच ऑस्ट्रेलियात हॉकी मालिका जिंकण्याचं कर्तृत्व दाखवलं आहे. जागतिकीकरणाने बदललेल्या खेळांचेही अर्थकारण, माध्यमांचा इंद्रजाली प्रभाव आणि त्याचबरोबर क्रिकेटमधील महानायकाचा अभाव अशा अनेक गोष्टी या बदलाला जबाबदार आहेत. तूर्तास, सचिन आणि त्याच्या जिवावर मोठय़ा होऊ पाहणाऱ्या बांडगुळांचा त्याच्या निवृत्तीनंतरसुद्धा अर्थकमाईचा उद्योग जोरात सुरू आहे. त्यावर सचिन नामक ब्रॅण्ड अद्यापही खपाऊ आहे. परंतु क्रिकेटमधील महानायकाच्या या शोधात अन्य खेळांच्या अनेक नायकांना मिळालेलं गौरवाचं स्थान नक्कीच ‘छोडो कल की बातें, कल की बात पुरानी..’ असं म्हणायला लावणारी आहे. ‘रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल’ या मराठी उक्तीप्रमाणेच सचिनच्या निवृत्तीनंतर अन्य खेळांचा होत असलेला विकास भारतासाठी यशदायी ठरो, अशी आशा धरू या!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2014 7:33 am

Web Title: after end of sachin tendulkar era
टॅग : Sachin Tendulkar
Next Stories
1 रोहितची संघर्षगाथा!
2 आता निर्भेळ विजयाचा पंच!
3 आनंदला पराभवाचा धक्का
Just Now!
X