मुंबई आणि आरसीबी या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यात झालेलं द्वंद्व चर्चेचा विषय ठरला होतं. आता सूर्यकुमार यादवं विराट कोहलीची स्तुती केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सराव करतानाचा एक व्हिडीओ विराट कोहलीनं शेअर केला आहे. यामध्ये शामी आणि सिराजच्या गोलंदाजीवर विराट कोहली सराव करताना दिसतोय. विराट कोहलीनं व्हिडीओ पोस्ट करताना म्हटलेय की,’मला कसोटी क्रिकेट अभ्यास सत्र आवडतं.’ विराट कोहलीच्या या ट्विटवर सूर्यकुमार यादवनं प्रतिक्रिया दिली आहे.

प्रॅक्टिस व्हिडीओवर सूर्यकुमार यादवनं प्रतिक्रिया देताना विराट कोहलीचं कौतुक केलं आहे. सूर्यकुमार यादवनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, ‘Energy, Fire Sound, can’t wait to watch Domination Fire’ असं ट्विट करत #theBrand असा हॅशटॅगही दिला आहे. सूर्यकुमार यादवच्या या ट्विटनंतर विराट कोहलीच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. याआधीही अनेकदा सूर्यकुमार यादवनं विराट कोहलीच्या फलंदाजीचं कौतुक केलं आहे. विराट कोहलीचं कौतुक करणारे जुने ट्विट सूर्यकुमार यादवच्या ट्विटवर मिळतील.

आयपीएल २०२० दरम्यान बंगळुरु आणि मुंबई यांच्यातील हायहोल्टेज सामन्यात विराट कोहलीनं सूर्यकुमार यादवची स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केला होता. पण सूर्यकुमारने धडाकेबाज खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवनं विराटकडे इशारा करत सर्व काही ठीक आहे ना? असं एकप्रकारे विचारलं होतं. सूर्यकुमार यादवची ही अदा सर्वांनाच भावली. कारण, निगेटिव्ह अॅटकला त्यानं पॉझिटिव्ह पद्धतीनं उत्तर दिलं होतं.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात सूर्यकुमार यादवची निवड झाली नाही. गेल्या तीन वर्षांपासून सूर्यकुमार यादवनं स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यानंतरही सूर्यकुमारची भारतीय संघात निवड झाली नाही. भारतीय संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री यांनी सूर्यकुमार यादवचं कौतुक करत लवकरच भारतीय संघात स्थान मिळेल संमय ठेव असं म्हटलं होतं. सूर्यकुमार यादवची भारतीय संघात निवड न झाल्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विराट कोहलीला कारणीभूत असल्याचं म्हटलं होतं.