ऑस्ट्रेलियाने मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यात २६३ धावांचा डोंगर रचून आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल याने धावांची बरसात केली. मॅक्सवेलने केवळ ६५ चेंडूत नाबाद १४५ धावांची खेळी साकारली. मॅक्सवेलच्या तुफान खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेसमोर २६३ धावांचे विक्रमी आव्हान उभे करता आले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर ८५ धावांनी विजय प्राप्त केला. मॅक्सवेलने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा जोरदार समाचार घेतला. मॅक्सवेलच्या धडकेबाज खेळीचे सोशल मीडियावर नेटिझन्स आणि माजी क्रिकेटपटूंनी भरभरून कौतुक केले. वीरेंद्र सेहवागने आपल्या स्टाईलमध्ये मॅक्सवेलच्या खेळीवर स्तुतीसुमने उधळली, तर हर्षा भोगले देखील मॅक्सवेलच्या खेळीने भारावले. त्यांनी ट्वेन्टी-२० विश्वात आता फलंदाजीचा आणखी कोणता नवा विक्रम यापुढील काळात होईल? कुणी गोलंदाज यावर काही सांगू शकेल का? असा सवाल उपस्थित केला.