सलग सात विजयांसह इंडियन बॅडमिंटन लीग (आयबीएल) स्पर्धेत सायना नेहवालने हैदराबाद हॉटशॉट्सला जेतेपद मिळवून दिले. खराब फॉर्म आणि दुखापती यांना बाजूला सारत सायनाने मिळवून दिलेले यश उल्लेखनीय होते आणि आता सायनापुढील लक्ष्य आहे राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकाचे.
‘‘यंदाच्या वर्षांतील उर्वरित सुपर सीरिज तसेच पुढील वर्षी होणारी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धा यावर मी लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत मुकाबला खडतर असणार आहे. या स्पर्धासाठी शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे आहे,’’ असे सायनाने सांगितले. १७ ते २२ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या जपान सुपर सीरिज स्पर्धेसाठी सायना तयारी करत आहे.
‘‘आयबीएलमुळे उदयोन्मुख खेळाडूंना फायदा झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल खेळाडूंबरोबर खेळण्याची आम्हाला संधी मिळाली, यामुळे भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा होणार आहे. आर्थिकदृष्टय़ाही आयबीएल खेळाडूंना किफायतशीर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अन्य कोणत्याही स्पर्धेपेक्षा जास्त पैसा आयबीएल खेळलेल्या खेळाडूंना मिळाला,’’ असे सायनाने सांगितले.
‘‘भारताचे अनेक युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखदार प्रदर्शन करत आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत बॅडमिंटनमध्ये मोठी प्रगती पाहायला मिळणार आहे. सिंधू, श्रीकांत चांगली कामगिरी करत आहेत, मात्र त्यांना थोडा वेळ देणे गरजेचे आहे. लवकरच सर्व प्रकारांत अव्वल १० मध्ये आपले खेळाडू असतील,’’ असे तिने सांगितले.