निदहास ट्रॉफीमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील अंतिम सामना पाहताना अनेकांचा श्वास रोखला गेला होता. शेवटचे षटक पाहताना तर अनेकांच्या ह्दयाचे ठोके वाढले होते. दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला पण गुजरातच्या वलसाडमध्ये एका ६२ वर्षीय निवृत्त शिक्षकाला ह्दयविकाराचा झटका आला. सामना संपल्यानंतर काही क्षणातच प्रविण पटेल वनकल गावातील आपल्या घरात कोसळले.

त्यांना लगेचच धर्मपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रविण पटेल क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहे. क्रिकेटचा कुठलाही सामना ते चुकवत नाहीत. कुटुंबिय, मित्रमंडळींसोबत बसून ते तासनतास सामना पाहतात असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.

आम्ही सर्वजण एकत्र बसून सामना पाहत होतो. संपूर्ण कुटुंब आणि काही मित्रही तिथे उपस्थित होते. सामना संपल्यानंतर माझे वडिल लगेच भोवळ येऊन खाली कोसळले असे त्यांचा मुलगा प्रफुल्ल पटेल (३०) याने सांगितले. त्यांना ह्दयविकाराच्या आजाराचा कोणाताही इतिहास नव्हता असे प्रफुल्लने सांगितले.