इंडियन सुपरलीगच्या(आयएसएल) दुसऱया पर्वाच्या अंतिम सामन्यात ‘गोवा एफसी’ संघावर मात करून ‘चेन्नईयन एफसी’ संघाने विजेतेपद पटकावले. विजयाचे जोरदार सेलिब्रेशन देखील झाले. पण या सेलिब्रेशनला मारहाणीचे गालबोट लागले. प्रतिस्पर्धी संघाच्या सह-मालकाला मारहाण केल्याप्रकरणी चेन्नई संघाचा कर्णधार एलानो ब्लूमर याला गोवा पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याची जामीनावर सुटका देखील झाली शिवाय, त्याला मायदेशी परतण्याचीही परवानगी देण्यात आली.  एलानो ब्लूमर सोमवारी पहाटे मायदेशी परतला आहे.
चेन्नई अजिंक्य
आयएसएलचे विजेतेपद पटकावल्यानंतर चेन्नईच्या संघाचे विजयी सेलिब्रेशन सुरू होते. त्यावेळी चेन्नई संघाचा कर्णधार ब्लूमर याने गोवा एफ-सी संघाचे सह-मालक दत्तराज साळगावर यांना मारहाण केल्याचा आरोप गोवा संघाचे दुसरे सह-मालक श्रीनिवास यांनी केला. सेलिब्रेशनंतर ब्लूमरने गोवा संघातील खेळाडूंची खिल्ली उडवत होता. त्यावेळी दत्तराज यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता ब्लूमर यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली, असे श्रीनिवास यांचे म्हणणे आहे. दरम्यान, तक्रार दाखल करण्यासाठी वैद्यकीय चाचणीसाठी दत्तराज यांनी नकार दिल्याने ब्लूमरविरोधात कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही.