इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात महेंद्रसिंह धोनीने केलेल्या संथ खेळामुळे त्याच्यावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली. भारताला जिंकण्यासाठी १०० पेक्षा जास्त धावांची गरज असताना धोनीने वेळकाढूपणा करत संथ खेळ केला. यामुळे मोक्याच्या क्षणी धावा जमावण्याची संधी भारताने गमावली. धोनीने या सामन्यात वन-डे क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला खरा, मात्र त्याची ही खेळी भारताला विजय मिळवून देऊ शकली नाही. सामना संपल्यानंतर विराट कोहलीने धोनीची पाठराखण करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. यानंतर भारतीय संघाचे सहायक प्रशिक्षक संजय बांगर यांनीही धोनीला आपला पाठींबा दर्शवला आहे.

“गेल्या दोन सामन्यांमध्ये आम्ही ज्या पद्धतीने संघ मैदानात उतरवतो आहेत, त्यामध्ये तळामध्ये आमच्याकडे चांगले फलंदाज नाहीयेत. त्यामुळे एखाद्या सामन्यात पहिल्या फळीतले फलंदाज लवकर माघारी परतले तर मधल्या फळीतल्या फलंदाजांवर त्याचा दबाव येतो. त्यामुळे तळातल्या फलंदाजासमोर मुक्तपणे फलंदाजी करता येत नाही. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी अप्रतिम मारा करत आम्हाला धावा काढण्याची संधी दिली नाही, आणि याच कारणामुळे आमचं आव्हान डोंगराएवढं वाढत गेलं.” अशा शब्दात संजय बांगर यांनी धोनीचा बचाव केला आहे. दुसऱ्या सामन्यात धोनीने ५९ चेंडूत केवळ ३७ धावा केल्या आहेत.

एखादा फलंदाज आपल्याला साथ देईल आणि आपण ४० व्या षटकापर्यंत आपण फलंदाजी करुन संघाचं आव्हान कायम राखू असा धोनीचा विचार होता. मात्र ज्या ज्या वेळी धोनीने आक्रमक होण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आमच्या विकेट पडत गेल्या. सर्वात पहिले रैना बाद झाला, त्यानंतर हार्दिकही माघारी परतला. या कारणामुळे धोनीला सावध खेळ करावा लागल्याचं बांगर म्हणाले. दरम्यान भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना आज हेडिंग्लेच्या मैदानात खेळवला जाणार आहे. ही मालिका सध्या १-१ ने बरोबरीत असून, अंतिम सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे.