आयपीएलच्या क्रिकेट युद्धाला सुरुवात झाली असताना आता सोशल मीडियावर गंमतीदार टीवटीव सुरु झाली आहे. मॅक्सवेलने उत्तुंग षटकार खेचल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने किंग्ज इलेव्हन पंजाबला टॅग करत मजेशीर ट्विट केलं. त्या ट्विटला पंजाबनंही गंमतीदार उत्तर दिलं आहे. दोन्ही संघामधील ट्वीट-रिट्वीट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) आणि मुंबई इंडियन्स या दोन संघामध्ये आयपीएल २०२१ चा आघाडीचा सामना रंगला. या सामन्यात आरसीबीने दोन गडी राखत मुंबई इंडियन्सवर मात केली. या सामन्यात मॅक्सवेलनं २८ चेंडुत ३९ धावा केल्या. या सामन्यात मॅक्सवेलनं आक्रमक फलंदाजी करत एक उत्तुंग षटकार ठोकला. हा चेंडू थेट मैदानाबाहेर गेल्यानं कर्णधार विराट कोहलीही आश्चर्यचकीत झाला. या सामन्यात विराट आणि मॅक्सवेलनं ५२ धावांची भागिदारी केली.

मॅक्सवेलच्या उत्तुंग अशा षटकारानंतर आरसीबीनं आपल्या ट्विटर हँडलवरून किंग्ज इलेव्हन पंजाबला टॅग करत ट्विट केलं. ‘पहिला उत्तुंग असा फटका, जवळपास चेन्नईच्या बाहेर गेला असं दिसतंय. धन्यवाद किंग्ज इलेव्हन पंजाब, जर सोशल डिस्टन्सिंगची नियमावली नसती तर आम्ही तुम्हाला मिठी मारली असती’ असं ट्वीट केलं.

या ट्वीटला पंजाबने मजेशीर प्रत्युत्तर दिले आहे. ‘गेल, केएल राहुल, सरफराज आणि मयंक अग्रवाल यांच्याबद्दलही तुमचे धन्यवाद’ असं ट्वीट करत उत्तर दिलं.

मुंबई इंडियन्सकडून कृणाल पंड्या ११ षटक टाकण्यासाठी आला होता. मात्र मॅक्सवेलने कृणाल पंड्याला पहिल्या चेंडूवरच षटकार खेचायचा हे ठरवलं होतं. जसा कृणाल पंड्याने चेंडू टाकला तसा मॅक्सवेलने पुढे येत उत्तुंग षटकार ठोकला. चेंडू थेट मैदानाबाहेर गेला. मॅक्सवेलचा हा षटकार १०० मीटर इतका लांब होता.

IPL 2021: ‘या’ कारणामुळे देवदत्त पडिक्कलवर इतर संघ नाराज!

आयपीएल २०२१ च्या लिलावत ग्लेन मॅक्सवेलला किंग्ज इलेव्हन पंजाबने करारमुक्त केलं होतं. त्यानंतर झालेल्या लिलावत आरसीबीने १४.२५ कोटी मोजून मॅक्सवेलला खरेदी केलं. तर ख्रिस गेल २०११ ते २०१७ या कालावधीत आरसीबीच्या ताफ्यात होता. केएल राहुल २०१३ साली आरसीबीमध्ये होता. त्यानंतर २०१६ साली पुन्हा त्याला आरसीबीने खरेदी केले. २०१८ पासून केएल राहुल पंजाबच्या संघात आहे.