स्थानिक क्रिकेटच्या कारकिर्दीत आपलं पहिलं वहिलं रणजी विजेतेपद पटकाववणाऱ्या विदर्भाच्या संघाने आणखी एक महत्वाची स्पर्धा जिंकली आहे. कर्णधार अथर्व तायडेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघाने घरच्या मैदानावर खेळताना १९ वर्षाखालील कूचबिहार करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विदर्भाला मध्य प्रदेशिवरुद्धच्या अंतिम सामन्यात विजयी घोषित करण्यात आलं.

विदर्भाचा कर्णधार आणि सलामीवीर अथर्व तायडेने या सामन्यात कर्णधाराला साजेशी खेळी केली. पहिल्या डावात अथर्वच्या त्रिशतकाच्या जोरावर विदर्भाने ६१४ धावांचा डोंगर उभा केला. अथर्वच्या ३२० धावांच्या खेळीत ३४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. विदर्भाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मध्य प्रदेशचा संघ पहिल्या डावात फक्त २८९ धावांपर्यंत मजल मारु शकला.

पहिल्या डावात ३२५ धावांची आघाडी घेतलेल्या विदर्भाच्या संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी न करता मध्य प्रदेशच्या संघाला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावातही विदर्भाच्या गोलंदाजांनी मध्य प्रदेशची अवस्था १७६/७ अशी बिकट करुन टाकली होती. विदर्भाकडून पहिल्या डावात दर्शन नलकांदेने ४ तर दुसऱ्या डावात पी. आर. रेखाडेने ३ बळी घेतले. साखळी फेरीत विदर्भाचा संघ दुसऱ्या स्थानावर राहिला होता.