भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज इशांत शर्मा हा काऊंटी क्रिकेटमध्ये खेळणार आहे. ससेक्स क्रिकेट क्लबशी इशांतने करार केला असून, या क्लबचं प्रतिनिधीत्व करणारा तो तिसरा भारतीय ठरला आहे. याआधी मन्सूर अली खान पतौडी आणि पियुष चावला यांनी ससेक्सचं प्रतिनिधीत्व केलं आहे. २९ वर्षीय इशांत शर्मावर आयपीएलमध्ये कोणत्याही संघमालकाने बोली लावलेली नाहीये. यामुळे इशांतने काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. चेतेश्वर पुजारानेही आयपीएलमध्ये बोली न लागल्यामुळे काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

“ससेक्स सारख्या जुन्या आणि प्रतिष्ठीत क्रिकेट संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. काऊंटी क्रिकेट खेळण्याची ही माझी पहिलीच वेळ असल्यामुळे मी याच चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे.” करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर इशांतने ससेक्स क्रिकेट क्लबचे आभार मानले. ससेक्स संघातील ख्रिस जॉर्डन आणि जोफ्रा आर्चर या दोन्ही खेळाडूंवर आयपीएलमध्ये बोली लागलेली आहे. त्यामुळे या दोन महत्वाच्या गोलंदाजांच्या अनुपस्थितीत आम्हाला एका अनुभवी गोलंदाजाची गरज होती. इशांत संघात येण्याने ती गरज पूर्ण झाली असल्याचं, ससेक्स क्रिकेट क्लबचे संचालक केथ ग्रिनफिल्ड यांनी म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज जेसन गिलेस्पी हा ससेक्स क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतो आहे. त्यानेही इशांतच्या संघातील सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ४ एप्रिल ते ४ जून दरम्यान इशांत इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळताना दिसेल. त्यामुळे आपल्या पहिल्या प्रयत्नात इशांत काऊंटी क्रिकेटमध्ये कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.