एक सामना संपल्यानंतर खेळाडूला आराम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, तर त्याच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी.व्ही.सिंधूला अंतिम फेरीत रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. तर सायना नेहवालला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसल्यामुळे तिला कांस्यपद मिळालं.

मात्र उपांत्य सामन्यासाठी आपल्याला तयार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही असं म्हणत, सायनाने स्पर्धेच्या आयोजकांवर टीका केली. रात्री सामना जिंकल्यानंतर लगेच सकाळी सायनाला उपांत्य फेरीचा सामना खेळावा लागला. यावेळी सायना नेहवालचे प्रशिक्षक विमल कुमार यांनीही स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. ऑलिम्पिक, जागतिक अजिंक्यपद सारख्या स्पर्धांमध्ये सामन्यांचं आयोजन हे योग्य पद्धतीने केलं जावं अशी मागणी केली आहे. ग्लास्गो शहरात झालेल्या स्पर्धेत उपांत्य सामन्यात सायनाला जपानच्या ओकुहाराकडून पराभूत व्हावं लागलं होतं.

अवश्य वाचा – वेळापत्रकातील नियोजनच्या अभावामुळेच पराभव; सायना नेहवालची नाराजी

“ज्या पद्धतीने सायनाला पराभव स्विकारावा लागला, त्याचं मला वाईट वाटतंय. रात्री उपांत्यपूर्व सामना खेळून लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी तिला उपांत्य सामना खेळायला उभं रहावं लागलं. माझ्यादृष्टीने स्पर्धेचं नियोजनं हे योग्य पद्धतीने करण्यात आलं नव्हतं.” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत विमल कुमार यांनी आपली नाराजी व्यक्त केली. या सर्व गोंधळासाठी मी स्पर्धेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना जबाबदार धरीन. उपांत्य, अंतिम सामन्याचं नियोजन हे टीव्ही पाहून केलं जाऊ नये. खेळाडूला आराम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणं ही देखील आयोजकांची जबाबदारी असते. दुर्दैवाने या स्पर्धेत ती जबाबदारी व्यवस्थित पाळली गेली नाही, असंही विमल कुमार यांनी म्हणलंय.

“ओकुहाराविरुद्ध सायनाचा इतिहास हा चांगला आहे. उपांत्य फेरीतला पहिला सेटही सायनाने जिंकला होता. सामन्यात मोक्याच्या क्षणी संथ खेळत समोरच्या खेळाडूची लय बिघडवण्याची मोठी कला सायनाकडे आहे. पण तिला या सामन्याआधी विश्रांतीचा पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे सायनाच्या निकालाबद्दल मला वाईट वाटतंय.” सध्या सिंधू आणि सायनाने केलेल्या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय.