भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पध्रेत ‘रौप्यक्रांती’ घडवली. सायनाच्या रूपाने या स्पध्रेच्या अंतिम फेरीत पहिल्यांदा भारतीय खेळाडूने धडक मारली होती. मात्र या इतिहासावर सुवर्णपदकाची मोहोर उमटवण्याचे तिचे स्वप्न भंगले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिने सरळ गेममध्ये सायनाला पराभूत केले. मात्र सायनाच्या या गरुडझेपेला समस्त क्रीडारसिकांनी सलाम केला.
रविवारी पार पडलेल्या अंतिम लढतीत गतविजेत्या कॅरोलिनने अवघ्या ५९ मिनिटांत २१-१६, २१-१९ अशा फरकाने सायनाला पराभूत केले. यंदाच्या वर्षांतील सायनाचा अंतिम फेरीतील सलग दुसरा पराभव आहे. याआधी ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पध्रेच्या अंतिम फेरीत कॅरोलिननेच सायनाला रौप्यपदकावर समाधान मानण्यास भाग पाडले होते. १९८३मध्ये प्रकाश पदुकोनयांनी कांस्यपदक जिंकून भारताला पहिले जागतिक पदक जिंकून दिले होते. त्यानंतर पी. व्ही. सिंधूने दोनदा, तर दुहेरीत ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पाने कांस्यपदक जिंकण्याची किमया साधली होती.कागदावर आतापर्यंतच्या लढतींमध्ये सायना कॅरोलिनाविरुद्ध ३-१ अशी वरचढ असली तरी अंतिम लढतीत कॅरोलिनाने दमदार खेळ केला. पहिल्या सेटमध्ये कॅरोलिनाने वर्चस्व गाजवले. सामन्यावर आपली पकड कशी कायम राहील, याची खात्री करताना कॅरोलिनाने वेगवान खेळ केला. सायनानेही तिला काही काळ झुंजवले. ७-७ अशा बरोबरीनंतर कॅरोलिनाने ११-८ आणि नंतर १५-९ अशी आघाडी घेत पकड मजबूत केली. कॅरोलिनाच्या शक्तीसमोर सायना गुणासाठी धडपडताना दिसली. दमदार स्मॅश लगावण्यात पटाईत असलेली सायना या लढतीत कॅरोलिनाच्या आक्रमक स्मॅशसमोर हतबल झालेली पाहायला मिळाली. पहिला गेम २०-१३ असा अटीतटीचा असताना सायनाने सलग तीन गुणांची कमाई करून चुरस अधिक वाढवली, परंतु कॅरोलिनाने २४ मिनिटांच्या या पहिल्या गेममध्ये २१-१६ अशी बाजी मारली.दुसऱ्या गेममध्ये सायनाकडून आशादायी सुरुवात झाली. कॅरोलिनाला चुका करण्यास भाग पाडून सायनाने ११-६ अशी आघाडी घेतली होती, परंतु सातत्य राखण्यात अपयश आल्याने कॅरोलिनाने पुनरागमन केले. सलग सहा गुणांची कमाई करताना कॅरोलिनाने १२-१२ अशी बरोबरी साधली. संपूर्ण कोर्टवर खेळ रंगत असल्यामुळे दोन्ही खेळाडू चांगलेच दमले होते. दोन्ही खेळाडूंमध्ये दीर्घकाळ फटक्यांचे हल्ले-प्रतिहल्ले सुरूच होते. सामना १७-१७ असा बरोबरीत असताना कॅरोलिनाने अधिक आक्रमक खेळ करून २०-१८ अशी आघाडी घेत विजयाकडे कूच केली. अखेर कॅरोलिनाला प्रतीक्षेनंतर विजयी गुण मिळाला आणि तिने कोर्टवर भावनिक जल्लोष साजरा केला. दुसरीकडे सुवर्णपदकाने हुलकावणी दिल्याने सायनाच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसत होते.

आज मी सर्वोत्तम खेळ करण्यात अपयशी ठरले, यापेक्षा चांगली कामगिरी करू शकले असते. पहिल्या गेममध्ये अनेक चुका झाल्या. दुसऱ्या गेममध्ये मी आघाडीवर होते, परंतु कॅरोलिनाने जलद खेळ करून गेम बरोबरीत आणला. मी तेव्हा संयम ठेवायला हवा होता. तंदुरुस्तीची कोणतीच समस्या नव्हती. अंतिम फेरी शारीरिकपेक्षा मानसिक कसोटी पाहणारी असते. दुसऱ्या गेममध्ये महत्त्वाच्या क्षणाला मी चूक केली. तुलनेने कॅरोलिना मुक्तपणे खेळ करत होती. – सायना नेहवाल

भारताचे पंचतारांकित यश
रौप्यपदक
: सायना नेहवाल (२०१५)
कांस्यपदक : प्रकाश पदुकोन (१९८३),
ज्वाला गट्टा, अश्विनी पोनप्पा (२०११),
पी. व्ही. सिंधू (२०१३, २०१४)