मलेशिया सुपर सीरिज स्पर्धेत उपांत्य फेरीला पराभवाला सामोरे जावे लागल्याचा परिणाम सायना नेहवालच्या क्रमवारीतील स्थानावर झाला आहे. सायना आता क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय खुल्या स्पर्धेच्या जेतेपदासह जागतिक क्रमवारीत सायनाने अव्वल स्थानी झेप घेतली होती. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल खेळाडूंमधील तीव्र स्पर्धेचा प्रत्यय सायनाला आला. दरम्यान, मलेशिया स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या ली झेरुईने अव्वल स्थानी कब्जा केला. विश्रांतीच्या कारणास्तव सायनाने सिंगापूर सुपर सीरिज स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे सायनाला क्रमवारीत अव्वल स्थानी आगेकूच करण्यासाठी विशेष मेहनत करावी लागणार आहे. दुखापतीमुळे पुनरागमन लांबणीवर पडलेली पी. व्ही. सिंधू क्रमवारीत नवव्या स्थानी स्थिर आहे. पुरुषांमध्ये युवा किदम्बी श्रीकांतने चौथे स्थान कायम राखले आहे. एच. एस. प्रणॉय १४व्या स्थानी स्थिर आहे. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता पारुपल्ली कश्यपने दोन स्थानांनी सुधारणा करून १५वे स्थान पटकावले आहे. दुहेरी प्रकारात ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीने एका स्थानाने सुधारणा करत १८वे स्थान गाठले आहे.