आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजित करण्यासाठी बीसीसीआयच्या मार्गातला एक अडथळा दूर झाला आहे. पाकिस्तानकडे यजमानपद असलेला यंदाचा आशिया चषक रद्द करण्यात आला आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता आशियाई क्रिकेट परिषदेच्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. बुधवारी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याविषयी घोषणा केली. त्यानंतर पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. पाक क्रिकेट बोर्ड सप्टेंबर महिन्यात श्रीलंका किंवा UAE मध्ये स्पर्धेचं आयोजन करण्याच्या विचारात होती. परंतू याच कालावधीत बीसीसीआय आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे, बीसीसीआयने पाक क्रिकेट बोर्डाला PSL स्पर्धेचे उर्वरित सामने पुढील वर्षी ढकलत नोव्हेंबरमध्ये आशिया चषक खेळवण्याची विनंती केली होती. पाक क्रिकेट बोर्डाने ही विनंती अमान्य करत आयोजनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला.

श्रीलंका आणि UAE क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी पाक क्रिकेट बोर्डाची चर्चाही सुरु होती. परंतू आयोजनातला धोका लक्षात घेता पाक क्रिकेट बोर्डाने यंदाची स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. “आशियाई क्रिकेट परिषद आता पुढील वर्षात या स्पर्धेचं आयोजन करेल. सध्याच्या घडीला स्पर्धेचं आयोजन करणं खूप धोकादायक आहे. श्रीलंकेत करोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्यामुळे आम्ही यजमानपदाचे हक्क श्रीलंकेला देऊन स्पर्धा आयोजित करण्याच्या तयारीत होतो. पण त्यात यश येताना दिसत नाहीये.” पाक बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला माहिती दिली. आयसीसीनेही स्पर्धा रद्द झाल्याबद्दलची माहिती दिली आहे.

दरम्यान या निर्णयामागे कोणत्याही प्रकारचं राजकारण नसल्याचं पाक क्रिकेट बोर्ड अध्यक्ष मणी यांनी स्पष्ट केलं. सुरुवातीला यजमानपदाचे हक्क पाकिस्तानकडे होते, परंतू करोनामुळे श्रीलंका किंवा युएईमध्ये आयोजन करावं असा आमचा प्रयत्न होता. आशियाई क्रिकेट परिषदेने यासाठी मान्यताही दिली होती. पण सध्याच्या परिस्थितीत खेळाडूंच्या सुरक्षेपेक्षा कोणतीही गोष्ट महत्वाची नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं मणी म्हणाले. दरम्यान आशिया चषक रद्द झाल्यामुळे बीसीसीआयला आता आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल काय निर्णय घेतं याची वाट पहावी लागणार आहे. टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलल्यानंतर बीसीसीआय त्या जागेवर आयपीएलचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे.