छत्तीसच्या आकडय़ाशी जोडल्या गेलेल्या अपयशी इतिहासाला बाजूला सारत भारतीय महिला हॉकी संघाने राष्ट्रीय क्रीडा दिनी रिओ ऑलिम्पिकवारी पक्की केली. तब्बल ३६ वर्षांनंतर भारताचा महिला हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या युरो हॉकी स्पर्धेत इंग्लंडच्या स्पेनवरील विजयासह भारताच्या ऑलिम्पिक सहभागावर तांत्रिकदृष्टय़ा शिक्कामोर्तब झाले.
युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेत इंग्लंडने उपांत्य फेरीत स्पेनवर मात केली, तर दुसऱ्या लढतीत नेदरलँड्सने जर्मनीवर विजय मिळवला. अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या इंग्लंड आणि नेदरलँड्स संघांनी याआधीच रिओवारी पक्की केली असल्याने अन्य संघाला ऑलिम्पिकचे दरवाजे खुले झाले. गेल्या महिन्यात अँटवर्प, बेल्जियम येथे झालेल्या जागतिक हॉकी लीग स्पर्धेत भारतीय संघाने पाचवे स्थान मिळवले होते. या बळावर भारतीय संघाचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने या तांत्रिक गोष्टीला दुजोरा दिला. दरम्यान, युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत धडक मारलेल्या इंग्लंड आणि नेदरलँड्स या संघापैकी विजेता संघ युरोपीय खंड विजेता म्हणून रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळू शकतो. यामुळे भारतासह आणखी एका संघाला ऑलिम्पिकची कवाडे खुली होणार आहेत.
आतापर्यंत कोरिया, अर्जेटिना, इंग्लंड, चीन, जर्मनी, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिका या देशांच्या बरोबरीने भारतीय महिला हॉकी संघही ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणार आहे.
१९८०मध्ये मॉस्को, रशिया येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ सहभागी झाला होता. त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.